नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवार दि. १३ जून रोजी देशातील राज्य आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. राज्यांनी शाळेत जाणा-या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यावर लक्ष द्यावे. तसेच कोरोनाचा बूस्टर डोस ज्येष्ठांना मिळेल याकडे लक्ष द्यावे, असा सूचना आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना केल्या.
जिनोम सिक्वेसिंग बळकट करण्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. आजपासून देशातील शाळा सुरु झाल्या आहेत. त्यातच देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या ४० हजारांपुढे गेली आहे.
महाराष्ट्रात रविवारी २,९४६ रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला. यात मुंबईत सर्वात अधिक १, ८०३ रुग्णांचा समावेश आहे. सध्याच्या घडीला राज्यात १६ हजार ३७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दुसरीकडे १ हजार ४३२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांचे कोरोना लसीकरण वाढवण्याची सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांनी राज्यांना केली आहे.