18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeराष्ट्रीयलसीकरणात भारत जगात दुस-या स्थानी

लसीकरणात भारत जगात दुस-या स्थानी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात लसीकरणाला वेग आला असून, अलिकडे नवनवे विक्रम स्थापित होत आहेत. आज पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त देशात २ कोटींवर लसीकरण झाले. हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक असून, आज देशात नवा विक्रम प्रस्थापित झाला. त्यातच जागतिक स्तरावर भारताचा वेग लक्षात घेतला तर लोकसंख्येच्या दृष्टीने जगात भारत दुस-या क्रमांकावर आहे, तर चीन प्रथम क्रमांकावर आहे. चीनमध्ये आतापर्यंत १ अब्जपेक्षा जास्त लोकांना लस दिली आहे, तर भारतात आतापर्यंत ७८ कोटी लोकांना लस दिली गेली आहे. दरम्यान, लोकसंख्येच्या टक्केवारीत विचार केला, तर जगात संयुक्त अरब अमिराती अव्वल स्थानावर आहे.

चीनने लसीकरणात आघाडी घेतलेली आहे. चीनमध्ये आतापर्यंत १ अब्जपेक्षा जास्त लोकांना लस दिली आहे. चीनच्या एकूण लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केल्यास देशात आतापर्यंत ७२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या दृष्टीने चीन लसीकरणात अव्वल स्थानावर आहे. यात दुस-या स्थानावर भारत आणि तिस-या स्थानावर अमेरिका आहे. दरम्यान, लसीकरण मोहिमेत भारताने युरोप महाद्वीपलाही पिछाडीवर टाकले आहे. भारतात आतापर्यंत ७८ कोटींपेक्षा अधिक लोकांना लस दिली गेली आहे, तर युरोप महाद्वीपमध्ये आतापर्यंत ७७.७ कोटी लोकांना लस दिली गेली आहे. यासोबतच उत्तर अमेरिकेत ५९.३ कोटी लोकांना, तर दक्षिण अमेरिकेत ४०.३ कोटी लोकांना लस दिली गेली आहे. लसीकरणात ओशिनिया आणि आफ्रिका महाद्वीप पिछाडीवर आहेत. आफ्रिकेत १२.९ कोटी, तर ओशिनियात ३ कोटी डोस दिले गेले आहेत.

भारतात लसीकरणाची सुरुवात १६ जानेवारी रोजी झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लस दिली गेली. १ मार्चपासून लसीकरणाच्या दुस-या टप्प्याला सुरुवात झाली. दुस-या टप्प्यात ६० पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना आणि गंभीर आजार असलेल्या ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर १ एप्रिलपासून ४५ ते ६० वयोगटातील सर्व नागरिकांना लस द्यायला सुरुवात झाली. १ मेपासून१८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस द्यायला सुरुवात करून व्यापक अभियान सुरू केले, तर २१ जूनपासून १८ वर्षांपासून सर्व नागरिकांना मोफत लसीकरण सुरू करण्यात आले.

६२ टक्के नागरिकांना आतापर्यंत पहिली लस
देशात लसीकरणाला वेग आला असून, आतापर्यंत ६२ टक्के लोकांना पहिली लस देण्यात आली आहे, तर २० टक्के नागरिकांना दोन्ही लस देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशात जेवढ्या लसींचा वापर झालेला आहे, त्यामध्ये ८७.८ टक्के कोविशिल्डचा वाटा आहे, तर १२.११ टक्के लस भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या आहेत. तसेच स्पुटनिक व्ही ही लस १ टक्के लोकांना दिली गेली आहे.

गर्भवती महिलांवर लसीकरणाचा परिणाम
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान संसर्ग झालेल्या ४ हजारहून अधिक गर्भवती आणि प्रसूतीनंतरच्या स्त्रियांवर अभ्यास करण्यात आला. त्यात असे दिसून आले आहे, की त्यापैकी कमीतकमी १६.३ टक्के महिलांची प्रसूती मुदतपूर्व झाली. तर, १०.१ टक्के महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला. हा अभ्यास इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित झाला आहे. यामध्ये लेखकांनी कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत १ मार्च २०२० ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान प्रेगकोविड रजिस्ट्रीचा भाग म्हणून महाराष्ट्रातील १९ ठिकाणी ४२०३ गर्भवती आणि प्रसूती झालेल्या महिलांवर अभ्यास केला आणि त्याचं विश्लेषण केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या