बीजिंग: वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी-७ राष्ट्र समूहात भारतासह चीनविरोधी देशांना सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भारताच्या संभाव्य प्रवेशावरून चीनचा जळफळाट सुरू झाला असून, भारताने आगीशी खेळू नये अशी धमकी चीनने दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दूरध्वनीद्वारे चर्चा झाली. यामध्ये भारताला जी-७ राष्ट्र गटात सहभागी करून घेण्याबाबतही चर्चा झाली. त्यानंतर चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या लेखात भारतासाठी हे पाऊल नुकसानदायक असणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत, रशियासह अन्य काही देशांना जी-७ समुहात सहभागी करून जी-१०, जी-११ बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रस्तावामुळे विकसित देशांचा फायदा होणार असला तरी भारताचे नुकसान होणार असल्याचा स्पष्ट इशारा चीनने दिला आहे.
Read More मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत काही निर्बंध आणखी शिथील व नवीन उपक्रमांना संमती
भारत सरकारला सत्ता ताकदीची भूक
ग्लोबल टाइम्समधील लेखानुसार, भारतात सध्या असलेल्या सरकारला सत्तेच्या ताकदीची भूख लागली असल्याचा आरोप चीनने केला आहे़ त्यामुळे त्यांना ट्रम्प यांचा डाव लक्षात येत नाही. सीमा प्रश्नात स्वत:ला बलशाली दाखवण्यासाठी भारत आता जी-७ आणि अमेरिकेची मदत घेण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आशियात चीन अधिक शक्तिशाली होत असल्यामुळे चीनविरोधात एक मोहीम सुरू झाली असल्याचे चीनने म्हटले आहे.
अमेरिकेची मदत भारताला महाग पडणार
मैत्रीपूर्ण संबंधानंतरही भारत चीनला आपला शत्रू मानत आहे. त्याचा परिणाम दोन्ही देशांच्या संबंधावर होत असल्याचा दावा चीनने केला आहे. चीनविरोधात अमेरिकेची मदत केल्यास भारताला हे महागात पडणार असल्याची धमकी चीनने दिली आहे. अमेरिका-चीन शीत युद्धात भारताने सहभागी होणे टाळले पाहिजे. भारत सहभागी झाल्यास त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसू शकतो अशी धमकी चीनने दिली आहे.