20.8 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeराष्ट्रीयअमेरिकी, चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर भारत

अमेरिकी, चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर भारत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत आणि भारतीय हे अमेरिका आणि चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. चीन, अमेरिकेसह जगातील अनेक देशांतील हॅकर्स भारतातील अभेद्य सुरक्षाचक्र भेदण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यामुळे भारतातील सुरक्षा, जनता आणि सरकारचा डेटा आणि बँकांतील पैशांवर डल्ला मारण्याचा धोका आहे.

पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेश पंत म्हणाले की, ४० टक्के सायबर हल्ले अमेरिकेतून होत आहेत. हे सायबर हल्ले ३-४ आयपी अ‍ॅड्रेसवरून केले जात आहेत. मात्र, अंतिम अ‍ॅड्रेस अमेरिकेचा असतो. सायबर गुन्हेगारांनी गुगल आणि अ‍ॅमेजॉन सर्व्हरची व्हर्च्युअल मशिन हायर केली आहे. यामध्ये स्टेट आणि नॉन स्टेट हॅकर्सचा समावेश होऊ शकतो. अमेरिकेतील नागरिकांचा डेटा कायद्याने सुरक्षित आहे. अ‍ॅपलसारखी कंपनीही अमेरिकी सरकारला आपला डेटा देत नाही. मात्र, तेथील हॅकर्स दुस-या देशावर निशाणा साधतात.

सायबर तज्ज्ञ संग्राम यांनी सांगितले की, सायबर सध्याच्या जगातील युद्धाचे नवे क्षेत्र बनले आहे. अमेरिका, रशिया, चीनसारखे देश भारतात सायबर हल्ले करतात. हे हल्ले सरकार समर्थित आणि गैरसमर्थितही असू शकतात. प्रभाव कमी करणे हा त्यांचा प्रमुख उद्देश असतो. एवढेच नव्हे, तर सायबरची कमतरता शोधण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो. त्यातून जर काही उणिवा सापडल्या, तर त्यावर हल्ला करण्याचा या हॅकर्सचा प्रयत्न असतो. भारतात सायबर हल्ल्यासाठी सायबर स्लीपर सेल तयार केले आहेत. ते सातत्याने सायबर सुरक्षेला छेद देण्याचा प्रयत्न करीत असतात. सायबर हल्ल्यासाठी मोबाईल, लॅपटॉप, गॅजेट यासारख्या विदेशी सामानाचा वापर करतात. त्यामुळे सायबर हल्ल्याचा धोका अधिक आहे.

देशात रोज होतात साडेतीन हजार हल्ले
सायबर तज्ज्ञ अमित दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२० मध्ये भारतात १३ लाखांवर सायबर हल्ले झाले आहेत. देशाला रोज तब्बल साडेतीन हजार सायबर हल्ल्याचा सामना करावा लागतो. याचाच अर्थ प्रतितास १५० हल्ले होतात. मात्र, वर्षात आठ ते दहावेळाच हल्ल्याचा अंदाज येतो.

सायबर हल्ल्यात भारताचे मोठे नुकसान
मायक्रोसॉफ्टच्या रिपोर्टनुसार जगभरात टेक सपोर्ट स्कॅमच्या माध्यमातून पैशावर सर्वाधिक प्रमाणात पाणी सोडण्यात भारतीय आघाडीवर आहेत. टेक सपोर्ट स्कॅममध्ये एक तृतीयांश भारतीयांनी आपला पैसा घालवला आहे. २०१८ मध्ये १४, तर २०२१ मध्ये ३१ टक्के लोकांना आपला पैसा गमवावा लागला.

सायबर गुन्हेगारीतही वाढ
दशकभरात स्मार्टफोन, टॅब आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे नागरिक जितके तंत्रस्नेही होत गेले. तितक्याच प्रमाणात महाराष्ट्रातील सायबर गुन्ह्यांंचा आलेख वाढत गेल्याचे दिसून येते. गेल्या ७ वर्षांत २३ हजारांहून अधिक सायबर गुन्ह्यांंची नोंद झाली असून केवळ ९९ आरोपींनाच शिक्षा झाली आहे. गेल्या दीड वर्षांच्या कोरोना काळात ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि भामटेगिरीचे प्रकार सर्वाधिक झाले आहेत.

२५ टक्के गुन्ह्यांचीच उकल
महाराष्ट्रात ७ वर्षांत २०१८ चा अपवाद सोडल्यास प्रत्येक वर्षी सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे आढळते. सात वर्षांत राज्यात २३ हजार ६०१ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. त्यातील केवळ ५ हजार ९९१ गुन्ह्यांंची उकल पोलिसांनी केली. म्हणजेच केवळ २५ टक्के गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले. त्यात आतापर्यंत ७ हजार २७४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तक्रारींबाबत उदासीनता
सायबर गुन्ह्यांत केवळ आर्थिक फसवणूकच नाही, तर पासवर्ड हॅक करण्यासह समाज माध्यमांतून अश्लील छायाचित्रे प्रसारण, शिवीगाळ, अश्लील संवाद यांचाही समावेश होतो. अनेकदा याबाबत तक्रार कशी आणि कुणाकडे करावी, हे नागरिकांना माहीत नसते. त्यामुळे आरोपी मोकाटपणे गुन्हे करतात.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या