नवी दिल्ली : मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी भारतीय हवाई दल भारतात सुमारे १०० प्रगत लढाऊ विमाने बनवण्याची योजना आखत आहे. या योजनेसाठी हवाई दलाने जागतिक विमान उत्पादकांशी बोलणीही सुरू केली आहेत.
लष्कराच्या उच्च सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पातील सुमारे ७० टक्के रक्कम भारतीय चलनात भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत भारतात ९६ विमाने बनवली जातील. यामध्ये ३६ चे पेमेंट भारतीय आणि विदेशी चलनात केले जाईल, तर ६० विमानांचे पेमेंट फक्त भारतीय चलनात केले आहे.
११४ विमाने खरेदी करण्याची योजना
आयएएफ ११४ विमाने खरेदी करण्याचा विचार करत आहे. ज्यामुळे सैन्याची लढाऊ क्षमता वाढणार आहे. तसेच मिग विमानाची जागा नवीन लढाऊ विमान घेतील. प्रकल्पाची सुरुवातीची १८ विमाने परदेशी विक्रेत्यांकडून घेतली जातील. एका स्पर्धेअंतर्गत या विमानांची चाचणी घेतली जाईल. त्यानंतरच त्यांची निवड केली जाईल. बोईंग, लॉकहीड मार्टिन, एमआयजी, डसॉल्ट आणि साब यांसारख्या कंपन्या या प्रकल्पाच्या शर्यतीत आहेत.