नवी दिल्ली : भारताचा चालू वर्षातील विकासदर वजा ७.७ टक्के असणार आहे, अशी माहिती केंद्रसरकारच्याच सांख्यिकी मंत्रालयाने दिली आहे. कोरोना महामारीच्या दणक्यामुळे भारताच्या जीडीपीत एवढी मोठी घट झाली असून पुढील आर्थिक वर्षात मात्र त्यात वाढीचे संकेत असल्याचेही केंद्रीय सांख्यिकी विभागाने सांगितले आहे.
केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने गुरुवारी भारताच्या आगामी आर्थिक वाटचालीबाबत पहिला अंदाज वर्तवला. अंदाजानूसार २०२०-२१ या वर्षात जीडीपीत मोठी घट झाल्याचे कबुल करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँक व ब्लुमबर्ग या वित्तीय संस्थांनी वर्तवलेल्या वजा ७.५ टक्केपेक्षाही अधिक घट भारतीय अर्थव्यवस्थेत होणार असल्याचे सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालातून दिसून येत आहे. गतवर्षी २०१९-२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे स्थिर मुल्याधारित मुल्य १४५.६६ लाख कोटी रुपये इतके होते. यंदा २०२०-२१ मध्ये त्यात ७.७ टक्क्यांनी घट होऊन ते १३४.४० लाख कोटी रुपये एवढे राहणार आहे. २०१८-१९ पेक्षा २०१९-२० मध्ये जीडीपी ४.६ टक्क्यांनी वाढला होता. तर यंदा २०१९-२० पेक्षा त्यात ७.७ टक्के घट होणार आहे. उत्पादन क्षेत्रातील घट सुमारे ९.४ टक्के इतकी मोठी असणार आहे. यंदाच्या वर्षात फक्त शेती क्षेत्राचा वाटा ३.४ टक्के असा अधिक वेगाने वाढला. मात्र इतर सर्वच क्षेत्रात घट नोंदविण्यात आली.
तेजीचेही संकेत
२०२०-२१च्या तिसºया तिमाहीतील हे आकडे असून पहिल्या तिमाहीशी तुलना करता त्यात चांगलीच सुधारणा झाली आहे. पहिल्या तिमाहीत ही घट २३.९ टक्के इतकी अभूतपुर्व होती. तसेच वर्ष २०२१-२२ मध्ये अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने वाढणार असल्याचेही सांख्यिकी मंत्रालयाने म्हटले आहे.