23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयचीनच्या ताब्यातील तिबेटवरुन गेला भारताचा टेहळणी उपग्रह

चीनच्या ताब्यातील तिबेटवरुन गेला भारताचा टेहळणी उपग्रह

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: भारताचा  टेहळणी उपग्रह चीनच्या ताब्यातील तिबेटवरुन  गेला. या घटनेनंतर अस्वस्थ झालेल्या चीनने तिथे सैन्याची जमवाजमव सुरू केली डीआरडीओने तयार केलेल्या उपग्रहाने तिबेटमधील चिनी सैन्याच्या सध्याच्या स्थितीची व्यवस्थित टेहळणी केली. अनेक फोटो काढले. यातून भारतीय सैन्याला त्यांच्या डावपेचांसाठी आवश्यक माहिती मिळाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या कौटिल्य उपग्रहामध्ये लष्करी हेतू साध्य करण्यासाठी उच्च क्षमतेच्या कॅमेऱ्यांची व्यवस्था आहे. या उपग्रहाच्या मदतीने रस्त्यावरील विशिष्ट व्यक्तीच्या हालचालींचीही बारकाईने नोंद होऊ शकते. शनिवारी हा उपग्रह अरुणाचल प्रदेश जवळच्या तिबेटच्या भूभागावरुन गेला.

सैन्याच्या सूचनांचे पालन करत इस्रो भारताच्या टेहळणी उपग्रहाचे नियंत्रण करते. विशिष्ट भागातील शत्रूच्या संपर्क यंत्रणेच्या लहरी पकडणे त्यावरुन माहितीचे विश्लेषण करणे अशी कामंही या उपग्रहाच्या मदतीने होतात. भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या चर्चेतून भारताला अपेक्षित असलेला १०० टक्के परिणाम अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे सैन्याकडून उपग्रहासाठी इस्रोला सूचना देण्यात आल्या. या सूचनेनुसार शनिवारी उपग्रह चीनच्या ताब्यातील तिबेटवरुन गेला.

भारतीय उपग्रह तिबेटवरुन गेल्याचे लक्षात आल्यानंतर चीनने तातडीने सैन्याची जमवाजमव सुरू केली. भारताच्या टेहळणी उपग्रहाने चीनच्या जिबुती बेटावरील सैन्याच्या तळाचीही टेहळणी केली. या ठिकाणी चीनच्या तीन युद्धनौका आहेत. भारत आणि चीन यांच्यात चर्चा सुरू असली तरी तणाव दूर होईल की नाही याबाबत ठामपणे काही सांगणे कठीण आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख नरवणे यांनी सांगितले. पाकिस्तान आणि चीन थंडीच्या मोसमात एकाचवेळी भारतीय सीमेवर हल्ले करण्याची शक्यता आहे. या दोन्ही हल्ल्यांचा विचार करुन भारतीय सैन्य वेगाने तयारी करत आहे. उपग्रह, रडार आणि ड्रोनच्या मदतीने शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम सुरू आहे. गुप्तचर यंत्रणाही पाकिस्तान आणि चीन बाबतची महत्त्वाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

संरक्षणमंत्री आणि तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख सातत्याने चर्चा करत आहेत. मागील काही दिवसांमध्ये सैन्याच्या प्रमुखांनी सीमावर्ती भागांचा दौरा करुन तिथल्या युद्ध सज्जतेचा आढावा घेऊन आणखी तयारीसाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. भारत आणि चीन यांच्यात ३५०० किमी एवढी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे. भारताने सीमेवर कुठेही चीनने अरेरावी केल्यास तातडीने चोख उत्तर देण्याची तयारी केली आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. यात भारताच्या कर्नलसह २० सैनिकांना वीरमरण आले. चीनने त्यांच्या हानीबाबत अद्याप चकार शब्द काढलेला नाही. मात्र चीनची मोठी हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक विदेशी गुप्तचर यंत्रणांनी गलवानमध्ये चीनला मोठा दणका देण्यात भारत यशस्वी झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. भारताने चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Read More  राज्यात आयसीएमआरचे अत्याधुनिक चाचणी केंद्र

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या