24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeराष्ट्रीयनोव्हेंबरमध्ये मिळू शकते स्वदेशी कोविशिल्ड लस !

नोव्हेंबरमध्ये मिळू शकते स्वदेशी कोविशिल्ड लस !

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड विद्यापीठ, अस्त्राझेनेकासोबत लस प्रकल्पात भागीदार असलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची पुढच्या वर्षभरात एक अब्ज लसीची निर्मितीची योजना आहे. संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडणा-या करोना व्हायरसविरोधात ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीने आशेचा किरण दाखवला आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या नियोजनानुसार सर्व बाबींमध्ये यश मिळाल्यास येत्या नोव्हेंबर महिन्यात ही लस उपलब्ध होऊ शकते, असा दावाही करण्यात आला.

पहिल्या फेजमध्ये या लसीची मानवी चाचणी यशस्वी ठरली आहे. सीरम एकूण लस उत्पादनांपैकी ५० टक्के लसी भारतासाठी उपलब्ध करून देणार आहे, तर उर्वरित लसी अन्य देशांना पाठवण्यात येतील. सर्व काही नियोजनानुसार झाले तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत भारतात लस उपलब्ध होऊ शकते. भारतात कोरोना व्हायरसच्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू करण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सुधारित प्रोटोकॉलला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सीरमला लवकरच भारतात ऑक्सफर्डच्या लसीच्या फेज २ आणि ३ च्या चाचण्या सुरु करता येतील.

सध्या सिरम इन्स्टिट्यूट कोरोना व्हायरस विरोधात अन्य कंपन्यांनी विकसित केलेल्या लसीची निर्मिती करणार आहे. पण २०२१ च्या अखेरीस स्वत:ची लस बाजारात आणण्याची सिरमची योजना आहे. सीरम फक्त ऑक्सफर्डच नव्हे, तर अमेरिका स्थित कोडॅगनिक्स या कंपनीसोबत मिळूनही लस विकसित करत आहे. ही लस आता प्री-क्लिनिकल ट्रायलच्या स्टेजवर आहे. त्याशिवाय आणखी काही कंपन्यांसाठीसुद्धा सीरम लसीची निर्मिती करू शकते. मात्र, अजून दोन स्टेजचा रिपोर्ट काय येतो, त्यावरही बरेच अवलंबून आहे.

वर्षअखेरपर्यंत ३० कोटी लसच्या निर्मितीचा प्रयत्न
व्यक्तीगत पातळीवर धोका पत्करून आम्ही काही लाख लसींच्या डोसची निर्मिती करणार आहोत. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करू. त्यात प्रतिमहिना सहा ते सात कोटी डोस बनवू. त्यानंतर ही क्षमता १० कोटी डोसपर्यंत वाढवू शकतो. यावर्षीच्या अखेरपर्यंत ३० कोटी लसीच्या डोसची निर्मितीचा प्रयत्न राहील. या लसीची किंमत १ हजार रुपयाच्या आसपास असेल, असे सीरमचे म्हणणे आहे.

अ‍ँटीबॉडीज निर्मिती करण्यास लस सक्षम
ऑक्सफर्डने विकसित केलेली ही लस मानवी शरीरात अँटीबॉडीजची निर्मिती करण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यात यशस्वी ठरली आहे. तसेच या लसीने शरीरात किलर टी-सेल्सची निर्मितीसुद्धा केली. विशेष म्हणजे याचे गंभीर साईड इफेक्टसुद्धा दिसले नाहीत. ही जमेची बाजू आहे.

पुण्याच्या प्लांटमध्ये होणार उत्पादन
पुण्याच्या हडपसरमधील प्लांटमध्ये सहा अत्याधुनिक मशिन्सवर ऑक्सफर्ड अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या लसीची निर्मिती केली जाईल. भारतात या लसीचे नाव ‘कोविशिल्ड’ असून सीरमने यामध्ये २० कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
प्रत्येक मिनिटाला ५०० बॉटल निर्मिती ळया प्लांटमधील प्रत्येक मशीन प्रतिमिनिटाला ५०० वायल म्हणजे छोट्या बाटलीमध्ये लसींची निर्मिती करू शकते. प्रतितास ३० हजार वायल्सची निर्मिती करण्याची क्षमता आहे. पण इतकी क्षमता असूनही मागणी प्रचंड आहे. सिरमचे सीईओ अदर पूनवाला यांनी ही माहिती दिली.

लस जादूची कांडी नाही : डब्ल्यूएचओ
कोरोनावरची लस शोधण्याचे प्रयत्न अनेक देशांमध्ये सुरू आहेत. काही ठिकाणी तिस-या टप्प्यातलीही चाचणी सुरु आहे. मात्र लस आली म्हणजे परिस्थिती जादूची कांडी फिरवल्यासारखी बदलेल, असे होणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी हे वक्तव्य केले. यासाठी आणखी काही महिने तरी कोरोना बरोबर राहील, कदाचित त्यापुढेही राहू शकतो, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या