नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शीना बोरा हत्याकांडात इंद्राणी मुखर्जी हिला जामीन मंजूर केला आहे. साडेसहा वर्षांनंतर हा जामीन मंजूर होत आहे. इंद्राणी मुखर्जी सध्या मुंबईतल्या भायखळा तुरुंगात आहे. शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी ती गेल्या साडेसहा वर्षांपासून कारागृहात आहे.
याआधी अनेकदा इंद्राणी मुखर्जीचा जामीन फेटाळण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालय, उच्च न्यायालयात कोणीही जामीन दिलेला नव्हता. कारण तिच्यावर तिचीच मुलगी शीना बोरा हिची आपला पूर्व पती, ड्रायव्हर यांच्या मदतीने हत्या केल्याचा आरोप होता. यात तिचा पती पीटर मुखर्जीचाही हात होता. याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होत्या. गेल्या तीन वर्षांत इंद्राणीने एकही पॅरोल घेतला नव्हता. याच सगळ्या गोष्टी लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. न्यायमूर्ती भूषण गवई, जे पूर्वी मुंबई उच्च न्यायालयात होते, आता सर्वोच्च न्यायालयात आहेत. त्यांच्या खंडपीठाने हा जामीन दिलेला आहे. त्यामुळे इंद्राणी मुखर्जीला मोठा दिलासा मिळाला आहे.
काय आहे शीना बोरा हत्याकांड प्रकरण?
२४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर शामवर राय याला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि चालक शामवर राय यांनी मिळून इंद्राणीची पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोरा हिची हत्या केली आणि रायगड जिल्ह्यात एका अज्ञात स्थळी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.