नवी दिल्ली : जानेवारी २०२३ मध्ये किरकोळ महागाईत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. यामुळे सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा पुन्हा एकदा वाढला आहे. सरकारने सोमवारी सीपीआयवर आधारित किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. यावेळी किरकोळ महागाईने उच्चांक गाठला आहे. अर्थात, ही आकडेवारी आरबीआयच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जगणे महाग होत आहे.
जानेवारी २०२३ मध्ये किरकोळ महागाईचा दर पुन्हा एकदा साडेसहा टक्क्यांच्या पुढे गेला असून, जानेवारीत किरकोळ महागाई दर ६.५२ टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे किरकोळ महागाईचा दरही उच्चांकावर गेल्याने चिंता वाढली आहे. कारण हाच दर डिसेंबर २०२२ मध्ये ५.७२ टक्क्यांवर नोंदवण्यात आला होता. त्या तुलनेत जानेवारीतील महागाई अधिक प्रमाणात वाढली आहे. एकीकडे केंद्र सरकार आणि आरबीआय महागाई नियंत्रणात आणण्यासाठी विविध पावले उचलत आहे. मात्र, महागाई कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. उलट ही स्थिती अधिक चिंता वाढविणारी आहे, तर किरकोळ महागाईच्या दरातील वाढदेखील तीन महिन्यांतील सर्वोच्च उच्चांकावर आहे. त्यामुळे किरकोळ महागाईनेही चिंता वाढविली आहे.
खाद्यपदार्थांच्या महागाईदरात वाढ
एकीकडे महागाईचा दर वाढत चाललेला असतानाच किरकोळ महागाईनेही उच्चांक गाठला आहे. त्यातच आता खाद्यपदार्थाच्या महागाईचा दरही बराच वाढला आहे. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण जानेवारीत खाद्यपदार्थांचा महागाई दर ५.९४ टक्के नोंदला गेला. डिसेंबर २०२२ मध्ये हाच दर ४.१९ टक्के होता. त्यावरून महागाई दराचा अंदाज येतो.
आरबीआयचे ४ टक्क्यांचे लक्ष्य
महागाई दरात सातत्याने वाढ होत असताना आरबीआयने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी ब-याच उपाययोजना केल्या. त्यात रेपो दरातही सातत्याने वाढ केली. परंतु या उपाययोजनांतून फारसा फरक पडलेला दिसत नाही. खरे तर रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई दर ४ टक्के ठेवण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. तसेच महागाईची व्याप्ती २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याची मर्यादा आहे. मात्र, आरबीआय यात यशस्वी ठरू शकलेली नाही.
.