नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये पँगाँग सरोवराच्या उत्तर काठावर गेल्या ४८ तासांत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने सैन्याची जमवाजमव केली आहे. प्रत्युत्तरात भारतानेही तिथे मोठ्या प्रमाणात जवान तैनात केले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या का वक्तव्याचा संदर्भ देत केंद्र सरकारवर टीका केली आहे. चीन आपली जमीन घेत आहे ही सुद्धा देवाचीच करणी का ? असा टोला राहुल यांनी ट्विटरवरुन लगावला आहे.
सीतारामन काय म्हणाल्या होत्या?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २७ ऑगस्ट रोजी झालेल्या वस्तू व सेवा कर परिषदेमध्ये अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. अर्थव्यवस्थेची बिकट स्थिती ही ‘ऍक्ट ऑफ गॉड’ असल्याचा उल्लेख केला होता. यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असे सांगत राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचे सांगितले होते. या वक्तव्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर आणि केंद्राच्या आर्थिक धोरणांवर टीका केली होती.
‘ऍक्ट ऑफ गॉड’ म्हणजे काय?
ऍक्ट ऑफ गॉड ही टर्म विमा व कायदेशीर बाबींमध्ये वापरली जाते. ढोबळपणे या टर्मचा अर्थ सांगायचा झाल्यास एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेसाठी कोणालाच जबाबदार धरता येत नाही. ती घटना घडून जाणे हे निसर्गामुळे होते आणि त्याला कोणीच काही करु शकत नाही असे सांगण्यासाठी ‘ऍक्ट ऑफ गॉड’ या शब्दाचा वापर करतात. मात्र आपण स्वत: काहीच काम न करता एखाद्या परिस्थितीबद्दल देवाला दोष देणे म्हणजे ‘अॅक्ट ऑफ गॉड’ होत नाही, असे गांधी यांना सुचवायचे आहे.
भारत-चीन सीमेवर परिस्थिती काय?
चिनी सैन्य मे महिन्यापासून फिंगर ४ पर्वतरांगांजवळ तळ ठोकून आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिण काठापासून ते ‘रेझांग ला’ जवळच्या ‘रचिन ला’पर्यंतच्या मार्गावरील उंच ठिकाणांवर भारतीय लष्कराने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या ठिकाणांवर ताबा मिळविण्याचा आता चीनचा प्रयत्न असल्याचे मानले जाते. चीनने संपूर्ण सैन्यमाघारीची तयारी दर्शवली होती. मात्र, चिनी सैन्याने फिंगर ४ पर्वतरांगांतून कधीच माघार घेतलेली नसून, त्यांनी या पर्वतरांगांच्या वरील भागात सुमारे २ हजार सैनिकांची जमवाजमव केल्याची माहिती सूत्रांनी दिली. चिनी सैन्याच्या हालचाली लक्षात घेऊन भारतीय लष्करानेही मोठ्या प्रमाणात जवान तैनात केले आहेत. तेथील परिस्थिती तणावपूर्ण असून, दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान फक्त ४००-५०० मीटरचे अंतर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जबाबदारी घ्या; ‘करणी’कडे बोट नको!