नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर तिहार जेलमध्ये कैदेत असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, मुसेवालाच्या हत्येत आपला संबंध नसल्याचे बिश्नोई याने म्हटले आहे अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांची हत्या ही सुडाच्या भावनेने घेण्यात आल्याचे बिश्नोई याने म्हटले असून या घटनेत आपला हात नसल्याचे म्हटले आहे.
सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर अनेक जणांनी या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. परंतु, अद्यापपर्यंत या मागील मुख्य आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. चौकशीदरम्यान लॉरेन्सने पोलिसांना सांगितले की, गोल्डी ब्रारला माहिती मिळाली होती की, मुसेवालाने ब्रारच्या मॅनेजरला परदेशात पळून जाण्यास मदत केली होती, ज्याचा विकी मुठीखेडा यांच्या हत्येशी संबंध असल्याचा आरोप आहे. दरम्यान, मुसेवालाच्या हत्येनंतर सोशल मीडियावर जे मेसेज पाठवले जात आहेत ते एकतर परदेशातून किंवा व्हीपीएनद्वारे पाठवले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सुरक्षा काढून घेतल्यानंतर हत्या
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची सुरक्षा कमी केल्यानंतर अवघ्या एका दिवसानंतर मुसेवाला यांची गोळया झाडून हत्या करण्यात आली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात मुसेवालाच्या शरिरात १९ गोळया लागल्याचा उल्लेख करण्यात आला असून, अतिरक्तास्त्रावामुळे मुसेवाला यांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.