कोलकाता : फ्लॅटमध्ये सापडलेले पैसे माझे नाहीत, माझ्या अनुपस्थितीत ते तिथे ठेवले गेले असे विधान अर्पिता मुखर्जी यांनी केले आहे. मुखर्जी या पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळच्या सहकारी आहेत. त्यांच्या दोन्ही घरांमध्ये सापडलेल्या रोख रक्कमेचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा ईडीने केला आहे.
शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी ईडीने नुकतीच अर्पिता मुखर्जी हीच्या कोलकातातील दोन घरांवर छापेमारी केली. या छाप्यात तिच्या घरातून तब्बल ५० कोटी रुपयांची रोक रक्कम आढळून आली. तसेच पाच किलोंहून अधिक वजनाचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटही आढळून आली होती. यावेळी मुखर्जी हीने हे पैसे आपण इतरत्र हालवणार होतो पण तत्पूर्वीच ईडीची रेड पडली असेही तीने म्हटले होते. पण आता तीने आपला जबाब बदलला असून माझ्या अनुपस्थितीत फ्लॅटमध्ये पैसे ठेवल्याचा दावा केला आहे.
पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी हे राज्यातील क आणि ड वर्ग शिक्षण भरती प्रकरणी अर्थात अकरावी-बारावीसाठी सहाय्यक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक भरती घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. या प्रकरणी ईडीने त्यांच्या चार ठिकाणांवर छापेमारी केली. अर्पिता मुखर्जी हीच्या चौकशीदरम्यान, ईडीला चॅटर्जींच्या या ठिकाणांचा पत्ता लागला. जिथून ईडीने काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली. दरम्यान, या प्रकरणी पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांना ३ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.