नवी दिल्ली : चिनी व्हिसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांना सीबीआय मुख्यालयात चौकशीदरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने कथित चीनी व्हिसा घोटाळ्याप्रकरणी अटकेपासून ३० मेपर्यंत अंतरिम संरक्षण दिले आहे. म्हणजेच ३० मेपर्यंत त्याला अटक होणार नाही. हे प्रकरण ईडीने नोंदवले आहे.
कार्ती चिदंबरम यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मी एकाही चिनी नागरिकाला व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केलेली नाही. याआधी त्यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला आहे. दरम्यान, २०११ मध्ये २६३ चिनी नागरिकांना व्हिसा बनवण्याशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी यापूर्वी कार्ती आणि त्यांचे वडील माजी अर्थ आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या निवासस्थानावर सीबीआयने छापे टाकले होते.