26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयदेशात अनेक भागात शुद्ध पाण्याची वानवा!

देशात अनेक भागात शुद्ध पाण्याची वानवा!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने घरोघरी नळ योजना सुरू करून थेट ग्रामीण भागापर्यंत शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची योजना सुरू केली आहे. आतापर्यंत अनेक गावांत नळही पोहोचला आहे. परंतु पर्यावरण संतुलनात घसरण होऊ लागल्याने पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे भारतात अनेक ठिकाणी शुद्ध पाण्याचे संकट भेडसावत आहे. त्यामुळे आगामी काळात व्यापक जलसुरक्षा अभियान राबविण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल संरक्षणासाठी लोकसहभागाची गरज आहे, असे मन की बातमध्ये म्हटले आहे. त्यामुळे याच पद्धतीने देशव्यापी अभियान राबविण्याची गरज आहे. कारण देशात नद्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या नद्या, ओढे, नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. परंतु जल संरक्षणाबाबत व्यापक चळवळ अद्याप राबविली गेली नाही. त्यामुळे अनेक भाग पाणी संकटाचा सामना करीत आहेत. मुळातच पर्यावण संतुलनात घसरण झाल्याने जलस्रोत आटायला लागलेआहेत. त्यातूनच पिण्याच्या पाण्याचे संकट भेडसावू लागले आहे. वाढती वृक्षतोड यातून जंगलाचा विनाश होत असून हिमनद्यांचा स्तर घसरत असल्याने पाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. यातून पृथ्वीवरील नैसर्गिक स्रोत संपुष्टात येत असून, यातून पर्यावरण संतुलनही बिघडत चालले आहे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पाणी हे नैसर्गिक आणि अमर्यादित संसाधन आहे. मात्र, पेयजलचे प्रमाण खूप मर्यादित आहे. अर्थात, पृथ्वीचा तब्बल ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. मात्र, प्रत्यक्षात पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण आणि त्यातील शुद्ध पेयजलचे प्रमाण खूप कमी आहे. जागतिक पातळीवर भारताचा विचार केल्यास जगातील एकूण लोकसंख्येच्या १७ ते १८ टक्के भाग एकट्या भारतात आहे आणि जलस्रोताचे प्रमाण केवळ ४ टक्के एवढेच मर्यादित आहे. त्यातही मानवी चुकांमुळे पाण्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे भविष्यात पाण्याचे संकट अधिक गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

भारतात ९.१४ कोटी बालके टंचाईच्या विळख्यात
भारतात ९.१४ कोटी बालकांना गंभीर जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढत्या गरजांसोबत पाण्याची मागणीही वाढत आहे, तर दुसरीकडे पाण्याचे स्रोत कमी होऊ लागले आहेत. त्यामुळेच शुद्ध पेयजलची समस्या अधिक भेडसावत आहे. यासाठी जल संरक्षणासाठी व्यापक अभियान हाच देशासमोरचा एकमेव पर्याय आहे.

पाण्याचा गैरवापर टाळा
वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि पाण्याची मोठ्या प्रमाणात होत असलेली बरबादी, नियोजनाचा अभाव, जलवायू परिवर्तन, निसर्गाचे बिघडलेले संतुलन यातून पाण्याची गुणवत्ता घसरत आहे. यातूनच जलसंकट भेडसावत आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचा गैरवापर टाळणे आवश्यक बनले आहे.

२०४० पर्यंत गंभीर स्थिती
युनिसेफच्या नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार २०४० पर्यंत जगात पाण्याचे गंभीर संकट निर्माण होऊ शकते. पाणीटंचाईमुळे जगातील प्रति चार मुलांपैकी एकाला टंचाईच्या क्षेत्रात राहण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे सध्या जलसंरक्षणावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडवले पाहिजे आणि जिथे पाण्याचे संकट आहे, त्या भागात पाणी वळवून संकट दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

बिलोलीचे कृषी अधिकारी पसलवाड लाच प्रकरणी चतुर्भुज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या