नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण या आर्थिक वर्षासाठी भारताचा अर्थसंकल्प सादर करत असताना अचानक त्यांच्या तोंडून बाहेर पडलेल्या एका शब्दाने लक्ष देऊन अर्थसंकल्पातील तरतूदी ऐकणा-या खासदारांना हसायला भाग पाडले आहे. अर्थमंत्र्यांचे बोलताना फंबल झाल्याने खुद्द पंतप्रधान मोदींसह इतर विरोधी नेत्यांनाही हसू आवरता आले नाही आणि अर्थसंकल्प सादर होत असतानाच सर्व खासदार मोठमोठ्याने हसू लागले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान जुनी वाहने रिप्लेस करण्याबाबत बोलत होत्या, तेव्हा चुकून त्यांच्या तोंडून जुनी राजकीय व्यवस्था बदलण्याची गरज असल्याचे वाक्य निघाले आणि पाहता पाहता संपूर्ण सभागृहात हशा पिकला. तेवढ्यात झालेली चूक अर्थमंत्र्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी लगेचच सॉरी म्हणत आपली चूक सुधारली. मात्र, अर्थमंर्त्यांनी अनावधानाने म्हटलेल्या राजकीय व्यवस्था बदलण्याच्या वक्तव्यावर खुद्द पंतप्रधानही आपले हसू आवरू शकले नाहीत.
नेमके काय म्हणाल्या अर्थमंत्री?
अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या, व्हेइकल रिप्लेसमेंट पॉलिसी, जुनी वाहने बदलणे हे एक गरजेचे आणि महत्त्वाचे धोरण आहे. जे जुनी राजकीय व्यवस्था बदलण्यावर काम करेल. ओह सॉरी, जी जुनी पोल्युटेड वाहने बदलण्यावर काम करेल. ही पॉलिसी भारलाता ग्रीन पॉलिसीला चालना देण्यासाठी प्रोत्साहन देईल. त्यांच्या या चुकीवर पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषीमंत्री, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी पक्षाच्या डिंपल यादव आणि इतर सर्व खासदारांना हसू आवरता आले नाही.