26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयस्क्रीन तुटलेल्या फोनवरून शिकला कोडिंग; शेतकरीपुत्राची १२ व्या वर्षी हार्वर्ड भरारी

स्क्रीन तुटलेल्या फोनवरून शिकला कोडिंग; शेतकरीपुत्राची १२ व्या वर्षी हार्वर्ड भरारी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीयांमध्ये प्रचंड क्षमता आहे, हे आपण नेहमीच ऐकतो. मात्र याचे मूर्तीमंत उदाहरण समोर आले असून एका बारा वर्षाच्या मुलाने सर्वांना अश्चर्यचकित करणारे काम केले आहे. या मुलाचे नाव कार्तिक जाखड असून त्याने वयाच्या बाराव्या वर्षी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी भरारी घेतली आहे. तुटलेल्या मोबाईल स्क्रीनवर कार्तिकने असा पराक्रम केला, ज्यामुळे त्याचे नाव आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

दिल्लीपासून शंभर किमी अंतरावर असलेल्या हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील झसवा गावात राहणाऱ्या कार्तिक जाखडच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. कार्तिकने तीन लर्निंग अ‍ॅप्सचा शोध लावला आहे. मात्र कार्तिकने यासाठी कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. त्याने मोबाईलवर व्हिडिओ पाहून अ‍ॅप्स तयार करण्याची किमया केली आहे. ज्या फोनद्वारे इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कार्तिकने कोडिंग शिकून अ‍ॅप्स बनवले, त्या मोबाईलची स्क्रीनही तुटलेली होती.

कार्तिकचे वडील अजित सिंह शेती करतात. कार्तिकला तीन बहिणी आहेत, ज्यात तो सर्वात लहान आहे. कार्तिकच्या घरात अभ्यासासाठी टेबल खुर्ची सोडा वीज सुद्धा २४ तास मिळत नाही. कार्तिक म्हणतो, की तिसरीपासूनच त्याला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. कोरोनाच्या काळात शाळा बंद होत्या, त्यानंतर वडिलांनी ऑनलाइन क्लासेससाठी ८-१० हजारांचा अँड्रॉइड फोन आणला होता. अभ्यास केल्यानंतर यूट्यूबवर कोडिंग आणि अ‍ॅप डेव्हलपमेंटबद्दल व्हिडीओ पाहिले. यूट्यूब वरूनच स्वत:च प्रशिक्षण घेऊन अ‍ॅपची निर्मिती केली. अ‍ॅप बनवताना कार्तिकला अनेक समस्या आल्या. फोन मध्येच हँग व्हायचा आणि कार्तिकला पुन्हा पुन्हा कोडिंग करावे लागायचे. मात्र या समस्येवरही आपण मात केल्याचे त्याने म्हटले.

कार्तिकने बनवलेले पहिले अ‍ॅप जनरल नॉलेजशी संबंधित आहे ज्याचे नाव ल्युसेंट जीके ऑनलाइन आहे, दुसरे अ‍ॅप श्री राम कार्तिक लर्निंग सेंटर आहे. ज्यामध्ये कोडिंग आणि ग्राफिक्स डिझायनिंग शिकवले जाते. तर तिसरे अ‍ॅप डिजिटल शिक्षणाशी संबंधित आहे, ज्याचे नाव श्री राम कार्तिक डिजिटल एज्युकेशन आहे. या लर्निंग अ‍ॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून तो एका संस्थेत सहभागी होऊन सुमारे ४५ हजार गरजू मुलांना मोफत ऑनलाइन शिक्षण देत आहेत.

कार्तिकला वयाच्या १२व्या वर्षी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. चाइल्ड प्रोडिजी अवॉर्ड, ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डसह, कार्तिकने ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सात वेगवेगळ्या प्रकारच्या विक्रमांची नोंद केली आहे. कार्तिकने हार्वर्ड विद्यापीठाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती मिळवली आहे. कार्तिक हार्वर्डमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीएस्सी करत आहे.

कार्तिक म्हणतो की तो अमेरिकेतील हार्वर्ड र्विद्यापीठातून शिकत असला तरी पुढे जाऊन तो भारतात राहूनच आपल्या देशासाठी काहीतरी करेल. संगणक क्षेत्रात आजपर्यंत कोणीही केले नाही, अस काही करायचे स्वप्न कार्तिकचे आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या