21.1 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home राष्ट्रीय देशात लॉकडाऊन वाढला : 7 सप्टेंबरपासून मेट्रोसेवा सुरु होणार

देशात लॉकडाऊन वाढला : 7 सप्टेंबरपासून मेट्रोसेवा सुरु होणार

एकमत ऑनलाईन

सांस्कृतिक , राजकीय कार्यक्रमांना परवानगी : धार्मिक कार्यक्रमही घेता येणार, शाळा, कॉलेजेस बंदच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाउन हळूहळू शिथिल केला जात असून, अनलॉक ३ चा टप्पा ३१ ऑगस्टला संपत असल्याने केंद्र सरकारकडून अनलॉक ४ मध्ये नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारने धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी दिली आहे, तर शाळा, महाविद्यालये तूर्तास बंद ठेवण्यात आली आहेत. परवानगी देण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
अनलॉक ४ साठीच्या मार्गदर्शक सूचना आज केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केल्या आहेत. गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना एकाच छताखाली होणा-या या कार्यक्रमांमध्ये केवळ १०० लोकांनाच सहभागी होता येणार आहे. त्याचबरोबर अशा कार्यक्रमात सहभागी होणा-यांना तोंडावर मास्क, सोशल डिस्टन्सिगचे पालन, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर यांचा वापर करणे अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर कोरोनासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या इतर नियमाचे पालन करण्यात यावे, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.

२१ सप्टेंबरपासून
कार्यक्रम घेता येणार
अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारने मेट्रो सेवा सुरू करण्यासह सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व धार्मिक सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. २१ सप्टेंबरपासून राज्यात हे कार्यक्रम घेता येणार असून, त्यासाठी काही बंधन घालण्यात आली आहेत.

५० टक्के शिक्षक, स्टाफला परवानगी
सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासला परवानगी दिली नाही. मात्र, मार्चपासून बंद शाळा, उच्च शिक्षण संस्थांमध्ये २१ सप्टेंबरपासून ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सेवेत रुजू होण्यास परवानगी दिली. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण, टेली-काऊन्सिंलिंग व शाळांचे कामकाज सुरू होण्यास मदत होईल.

७ सप्टेंबरपासून
मेट्रो सुरू होणार
केंद्र सरकारने १ सप्टेंबरपासून सुरू होणा-या अनलॉक-४ साठी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार देशातील मेट्रो सेवा सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. येत्या ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू होणार आहेत. दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांत मेट्रोसेवा आहे. मुंबईत घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर मेट्रो धावते. या मार्गावर मोठ्या प्रमाणात कंपन्यांचे व कार्यालयांचे जाळे आहे. हजारो नोकरदारांना या सेवेचा लाभ होणार आहे.

जिल्हा, राज्य बंदी नाही
एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात आणि एका राज्यातून दुस-या राज्यात जाण्यास कसलीही बंदी नाही. अर्थात, देशात कुठेही फिरण्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज नाही. परंतु राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे लक्ष असणार आहे.

केंद्राच्या परवानगीशिवाय
आता लॉकडाऊन नाही
अनलॉक ४ च्या नियमावलीनुसार कन्टेन्मेंट झोन आणि लॉकडाउनबाबत केंद्राने राज्यांना महत्वपूर्ण सूचना केली आहे. त्यानुसार केंद्र सरकारला विचारल्याशिवाय राज्यांनी कन्टेन्मेंट झोनबाहेर लॉकडाउन लावता येणार नाही, असे निर्देश केंद्राने राज्यांना दिले आहेत. त्यामुळे आता केंद्राच्या परवानगीशिवाय राज्यांना स्थानिक पातळीवर लॉकडाउन करता येणार नाही.

चित्रपटगृहे, स्वीमिंग पूल, रेल्वे
आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंदच
अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकार चित्रपटगृह खुली करण्यास परवानगी देण्याची अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांच्या बाबतीतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र, चित्रपटगृहांसह स्वीमिग पूल (जलतरण तलाव), आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा (विशेष विमान सेवा वगळून), प्रवासी रेल्वे सप्टेंबरमध्येही बंदच राहणार आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारने शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

९ वी ते १२ च्या विद्यार्थ्यांना मुभा
शाळा आणि उच्च शिक्षण सुरू करण्याच्या दृष्टीने प्रथमच हालचाली सुरू झाल्या आहेत. अनलॉक-४ मध्ये प्रथमच ९ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाण्याची परवानगी देण्यात आली. कंटेन्मेंट झोनच्या बाहेरील या शाळांना परवानगी मिळाली. मात्र, यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकता येणार नाही, तर आई-वडिलांची लिखित परवानगी अनिवार्य आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा उच्चांक; २६९ पॉझिटीव्ह

२४ तासांची सूट हवी असल्यास फास्टॅग अनिवार्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,444FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या