पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय घडमोडींना अधिकच वेग आला आहे. निवडणुकीअगोदरच ‘एनडीए’त फूट पडली आहे. पासवानांच्या लोक जनशक्ती पार्टीने नितीशकुमार यांचे नेतृत्व नाकारत या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, गरज पडल्यास भाजपाबरोबर काम करण्याची तयारी असल्याचेही सांगितले आहे.
रविवारी दिल्लीत पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय लोक जनशक्ती पार्टीने जाहीर केला. या बैठकीतून बाहेर
पडल्यानंतर लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी माध्यमांना व्हिक्टरीचे चिन्ह दाखवत स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचे दर्शवले. राष्ट्रीय पातळीवर लोकसभा निवडणुकीत भाजपा व लोक जनशक्ती पार्टीचे भक्कम युती आहे. राजकीय स्तरावर व विधानसभा निवडणुकीत आघाडीतील जनता दल यूनायटेडशी वैचारिक मतभेद असल्याने बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे लोक जनशक्ती पार्टीकडून सांगण्यात आले आहे.
निकालानंतर रणनीती ठरणार
निकालानंतर लोक जनशक्ती पार्टीचे विजयी झालेले आमदार पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या मार्गाबरोबर राहून भाजपा-लोजपा सरकार बनवतील, असेदेखील लोक जनशक्ती पार्टीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे स्वतंत्र निवडणूक लढताना पासवान यांनी भविष्यात भाजपसोबत जाण्याचा मार्ग राखीव ठेवला आहे.
एनडीएशी मैत्रीपूर्ण लढत?
राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टीने नितीशकुमार यांचे नेतृत्व नाकारत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भविष्यात भाजपसोबत जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीत लोकजनशक्ती पार्टीच्या अनेक जागांवर एनडीएच्या उमेदवारांसोबत मैत्रीपूर्ण लढती होतील, असे सांगण्यात आले.
युवा नेत्यांची लागणार कसोटी
या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे, तर या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
उमेदवारीबाबत भाजपचे दिल्लीत मंथन
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी दिल्लीत पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. या बैठकीत उमेदवारांच्या नावावर मंथन करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राजनाथसिंह, शिवराजसिंह चौहान, बिहारचे प्रभारी भुपेंद्र यादव यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
भाजप-जदयू फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला
एनडीएमधून लोक जनशक्ती पार्टी बाहेर पडल्याने बिहार निवडणुकीत भाजप आणि जदयू फिफ्टी-फिफ्टी जागा लढविणार आहेत. या अगोदर जदयूला भाजपपेक्षा अधिक जागा हव्या होत्या. मात्र, नितीशकुमार यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. भाजप आणि जदयू एनडीएसोबत येणा-या अन्य मित्र पक्षांना आपापल्या वाट्यातील जागा देऊ शकतात.