बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घाला, अशी मागणी सीमा भागात हैदोस घालणा-या रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र फाडून रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.
कर्नाटकच्या बसवर हल्ला केल्यास महाराष्ट्राचे एकही वाहन कर्नाटकात येऊ दिले जाणार नाही. कर्नाटक सरकार हातात बांगड्या घालून बसले नाही. निष्कारण जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न कराल, तर आमच्याशी गाठ आहे, अशी दर्पोक्ती कन्नड रक्षण वेदिकेच्या म्होरक्याने बेळगावात दिली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमून घोषणाबाजी करून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. बंगळूरमधून पुढील आठवड्यात हजारो कार्यकर्ते बेळगावला येणार आहेत. बेळगावातील आणि अन्य भागातील कन्नड जनतेचे आम्ही रक्षण करण्यास कटिबध्द आहोत, असेही कन्नड संघटनेचा म्होरक्या म्हणाला.
दरम्यान, कर्नाटकने महाराष्ट्रात बससेवा सुरू केल्यानंतर अथणी-सांगली या कर्नाटकच्या बसवर सांगली येथे दगडफेक करण्यात आली. महाराष्ट्रात कर्नाटकच्या बसला दौंडमध्ये काळे फासल्यानंतर कर्नाटकने महाराष्ट्रातील बससेवा शुक्रवारी दुपारनंतर स्थगित केली होती. तथापि, शनिवारी सकाळी ११ वाजता कर्नाटकने आपली महाराष्ट्रात बससेवा सुरू केली.