Thursday, September 28, 2023

टॉप १० विद्यापीठाच्या यादीतून महाराष्ट्र बाहेर

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फे्रमवर्क (एनआयआरएफ) २०२३ म्हणजेच, देशभरातील शैक्षणिक संस्था, विद्यापीठांचे रॅकिंग जारी करण्यात आले आहे. या यादीत निराशाजनक बाब म्हणजे, देशातील सर्वोत्तम टॉप १० विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाला स्थान मिळालेले नाही.

मुंबई आयआयटीने देशातील इंजिनिअरिंग शिक्षण संस्थांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे, तर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये मुंबई आयआयटी चौथ्या क्रमांकावर आहे. तर इनोव्हेशनच्या बाबतीत देशात मुंबई आयआयटीचा सातवा क्रमांक आहे. तर देशातील दंत महाविद्यालयांच्या यादीमध्ये पुण्याच्या डी.वाय. पाटील विद्यापीठ तिस-या क्रमांकावर आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय दरवर्षी देशातील सर्वोच्च युनिव्हर्सिटीज, निरनिराळ्या क्षेत्रातील टॉप कॉलेजेस यांची यादी जाहीर करते. यामुळे मुलांना चांगल्या विद्यापीठात आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेता येते. यंदाही म्हणजे २०२३ साठी रँकिंग जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये देशातील टॉप-१० विद्यापीठांची तसंच इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट आणि मेडिकल क्षेत्रातील टॉप-१० कॉलेजेसची लिस्ट देण्यात आली आहे.

विद्येचे मुंबईकडे शिफ्ट?
टॉप विद्यापीठांच्या यादीत टॉप १० मध्ये महाराष्ट्रातील एकाही विद्यालयाचा समावेश नाही. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ हे या यादीत १९ व्या क्रमांकावर आहे. तर मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी २३ व्या क्रमांकावर आहे. तसेच, पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल हे या यादीत ३२ व्या क्रमांकावर आहे.

आयआयटी मद्रास अव्वल
या वर्षी आयआयटी मद्रासने एकूण क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत, एम्स, दिल्ली पहिल्या स्थानावर आहे, पीजीअमेर चंदीगड दुस-या स्थानावर आणि ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर तिस-या स्थानावर आहे. या यादीमध्ये शीर्ष विद्यापीठे, सर्वोच्च महाविद्यालये आणि सर्वोत्तम अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा आणि व्यवस्थापन आणि फार्मा महाविद्यालयांसह उप-श्रेणींमध्ये उच्च शिक्षण संस्थांची क्रमवारी समाविष्ट आहे.

यंदा नवीन विषय
२०२२ मध्ये महाविद्यालये, विद्यापीठे आणि संशोधन संस्था आणि सात विषय डोमेन अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, कायदा, औषध, वास्तुकला आणि दंतचिकित्सा अशा फक्त चार श्रेणी होत्या. मात्र या वर्षी एनआयआरएफने नवीन विषय जोडला आहे, कृषी आणि संलग्न क्षेत्रे. याव्यतिरिक्त, आर्किटेक्चर शाखेचे नाव बदलून आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग असे करण्यात आले आहे. यात सुमारे ८६८६ संस्थांनी भाग घेतला.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या