नवी दिल्ली : केंद्र सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदावरील नियुक्तीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. सीडीएस पदासाठी पात्र अधिका-यांची व्याप्ती वाढवत, संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार आता नौदल आणि हवाई दलात सेवा करणारे लेफ्टनंट जनरल किंवा त्यांच्या समकक्ष पदावरील अधिकारीदेखील सीडीएस पदासाठी पात्र ठरणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने वायू दल कायदा १९५० च्या कलम १९० मधील एअरफोर्स रेग्युलेशन १९६४ मध्ये देखील सुधारणा केली आहे.
पात्रतेच्या निकषांमध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे नुकतेच निवृत्त झालेले लष्करप्रमुख आणि उपप्रमुखही या पदासाठी पात्र असणार आहेत. असे असले तरी त्यांच्यासाठी ६२ वर्षे ही वयोमर्यादा घालण्यात आली आहे. देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत. रावत यांचे निधन झाल्यापासून सीडीएस पद रिक्त आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे भारतीय लष्करातील सर्वात मोठ्या पदांपैकी एक पद आहे. हे पद भारत सरकार आणि तिन्ही संरक्षण दलांच्या कामकाजात अधिक समन्वय राखण्यासाठी तयार करण्यात आले होते.