नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या काही नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आगामी राष्ट्रपती निवडणुकीबद्दल चर्चा होणार आहे आणि विरोधकांचा राष्ट्रपतिपदाचा चेहरा कोण असेल यावर चर्चा होणार आहे. तसेच भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढण्याची रणनीतीही ठरवणार आहेत.
मात्र या बैठकीला पक्षातल्या काही नेत्यांनीच पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. या बैठकीसाठी तेलंगण राष्ट्र समिती आपला प्रतिनिधी पाठवणार नाही. तर आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल हेही या बैठकीत सहभागी होणार नाहीत. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरच आम आदमी पक्ष या विषयात लक्ष घालणार आहे.
या बैठकीच्या आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांची भेट झाली. राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुका १८ जुलै रोजी होणार आहेत. तर त्यांचा निकाल २१ जुलै रोजी लागणार आहे. माजी मंत्री एच. डी. देवेगौडा, जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी, राष्ट्रीय लोक दलाचे जयंत चौधरी आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती हे या बैठकीमध्ये सहभागी होतील, अशी माहिती मिळत आहे.