मुंबई : भाजपाचे नेते कृपाशंकर सिंह यांनी योगी सरकारला पत्र लिहित उत्तर प्रदेशातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची मागणी केली आहे. यामुळे उत्तर प्रदेशातल्या लोकांना महाराष्ट्रात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील, असेही या पत्रात म्हटले आहे. विशेष बाब म्हणजे हा प्रस्ताव योगी आदित्यनाथ यांच्या विचाराधीन आहे. प्रायोगिक तत्त्वावर वाराणसीच्या शाळांमध्ये याचा प्रयोग करणार असल्याची माहिती मिळत आहे.
सरकारी नोकरभरतीत मराठी आणि उत्तर भारतीय यावरून अनेक वर्षे वाद सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले आणि आता नुकतेच भाजपामध्ये आलेले कृपाशंकर सिंह यांनी उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात सरकारी नोकरी मिळवण्याच्या संदर्भात ही मागणी केली आहे. पण आता बाहेरचे विद्यार्थी मराठीचे ज्ञान घेऊन इथे येऊ लागले, तर मग भूमिपुत्रांचं काय? यावरून वाद निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे योगी सरकारही या प्रस्तावावर सकारात्मक विचार करत आहे.
दरम्यान, मनसेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, कोणी मराठी भाषा शिकावी याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही. पण उत्तर प्रदेशातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्याऐवजी रोजगारनिर्मितीवर काम करावे. जेणेकरून कोणालाही ऊठसूठ नोकरी, रोजगारासाठी महाराष्ट्रात यावे लागणार नाही.