नवी दिल्ली : कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. येत्या 23 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब या राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत आहेत.
देशातली कोरोनाची स्थिती, वाढत असलेली रुग्णांची संख्या, सगळे व्यवहार सुरू करण्यासाठीचा लोकांचा दबाव आणि पुढची रणनीती यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.
राज्यात दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या जास्त असतांनाच शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे. शनिवारी दिवसभरात 23 हजार 501 रुग्ण कोरोनामुक्त झालेत तर 21 हजार 907 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासांमध्ये 425 जणांचा मृत्यू झाला. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे 72.22 टक्के एवढं झालं आहे. तर मृत्यूचं प्रमाण हे 2.71 टक्के एवढं आहे.
राज्यात आत्तापर्यंत 8 लाख 57 हजार 933 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 88 हजारांवर गेली आहे. तर राज्यात 3 लाखांच्या जवळ Active रुग्ण आहेत. देशात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असून सगळे व्यवहार सुरळीत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढत असतांना पुढे कशा पद्धतीने जायचे असा आता सगळ्याच राज्यांसमोर प्रश्न आहे. देशात कोरोना लशीवरही वेगात संशोधन सुरू असून 2021च्या सुरुवातीला लस निघेत असं मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं होतं. राज्याला जास्त आर्थिक मदतीची गरज असून मुख्यमंत्री पंतप्रधानांपुढे असे अनेक प्रश्न मांडणार आहेत.
अमली पदार्थांसह दोघांना मीरारोडच्या नया नगर भागातून अटक