25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयटायगर हिलवर सापडला खनिजांचा खजिना

टायगर हिलवर सापडला खनिजांचा खजिना

एकमत ऑनलाईन

द्रास : जगातील दुस-या क्रमांकाचे थंड गाव असलेला द्रासचा परिसर हा खनिज संपत्तीने भरलेला आहे. कारगिल युद्धावेळी जगासमोर आलेल्या टायगर हिलला लागूनच एक ऑरेंज हिल असून त्यात स्टेनलेस स्टील आणि रंग उद्योगाला लागणारे क्रोमाइट खनिज मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि पुण्यातील अन्य काही संशोधक या भागाच्या दौ-यावर आले आहेत. त्यांच्यासमवेत डॉ. सुरेश गोसावी, डॉ. करमळकर, रेमंड दुरायस्वामी, शिवानी हर्षे, डॉ. मल्लिका जोन्नलगड्डा हे आहेत. त्यांनी कारगिल वॉर मेमोरियलजवळ असलेल्या टायगर हिल परिसराची पाहणी केली.

त्यावेळी त्यांना लोह, मॅग्नेशिअम आणि क्रोमियम ही खनिजे असलेले दगड सापडले. त्यातही क्रोमाइट मोठ्या प्रमाणावर असल्याचे या संशोधकांनी सांगितले. भूशास्त्राचे संशोधक असलेले डॉ. करमळकर यांनी सांगितले की क्रोमाइटचे प्रमाण या दगडांमध्ये ६०-७० टक्के आहे, तर अन्य दोन खनिजांचे प्रमाण तीस टक्के आहे. त्यामुळे त्यांना शुद्धरुप मानावे लागेल. क्रोमाइट हे उद्योगांसाठी महत्त्वाचे खनिज आहे. स्टेनलेस स्टील बनविण्यासाठी, गंज रोखण्यासाठी तसेच रंगनिर्मितीमध्ये त्याचा उपयोग केला जाते. कारगिलच्या युद्धभूमीतील ऑरेंज हिल टेकडीवर या खनिजांचे भांडार आहे.

उद्योग क्षेत्राला उभारी मिळणार
ओडिशा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये या खनिजांच्या खाणी आहेत. हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये या खनिजांचे अस्तित्व नोंदले गेले होते. पण गेली अनेकवर्षे त्यावर काम झालेले नाही. मात्र अशा प्रकारची खनिजे सापडली पाहिजेत. जेणेकरून उद्योग क्षेत्राला उपयोग होईल. आता केवळ संशोधन म्हणून आम्ही त्याकडे पाहतो आहोत. भविष्यात उद्योग क्षेत्र त्यांची किंमत ठरवू शकतील. आता कारगिलच्या द्रास भागात ही खनिजे सापडतात. पण युद्धस्मृतीचा परिसर असल्याने तेथून खनिजे काढता येणे अशक्य वाटते. परंतु कारगिल जिल्ह्याच्या अन्य काही भागांत ही खनिजे सापडतील, त्यावर आणखी संशोधन होण्याची गरज आहे असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

अन्य खनिजांचेही साठे
संशोधकांच्या पुण्यातील गटातील डॉ. रेमंड दुरायस्वामी हे लडाखमधील नुब्रा व्हॅलीमध्ये संशोधन करीत आहेत. तिथे तांबे, शिसे आणि जस्त ही खनिजे सापडली आहेत. या खनिजांचे मोठे साठे तिथे असू शकतात, हे उद्योगांसाठी भविष्यात फायद्याचे ठरू शकेल असा विश्वास डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केला. संशोधकांच्या दृष्टीने खनिजजन्य दगड सापडणे महत्त्वाची गोष्ट असते. कारण त्यातून कित्येक वर्षापूर्वी जमिनीखाली आणि वर झालेल्या घडामोडींचा आदमास लावणे सोयीचे ठरू शकते. हिमालयाच्या निर्मितीचा अंदाजही त्यातून बांधता येऊ शकतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या