पाटणा : आपण अनेकदा आपला रस्ता चुकतो, पण तुम्ही कधी ऐकलं का की रेल्वेचा रस्ता चुकला? असाच काहीसा प्रकार बिहारमध्ये घडला आहे.
१५६५३ गुवाहाटी-जम्मूतावी अमरनाथ एक्स्प्रेस बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील बरौनी जंक्शनवर पोहोचली. बरौनी जंक्शननंतर ही रेल्वे समस्तीपूर जंक्शनला पोहोचणार होती पण ही रेल्वे अचानक विद्यापतीनगर स्टेशनवर पोहोचली. रेल्वे पाहून अधिका-यांना धक्काच बसला.
सुत्रांच्या माहितीनुसार, ड्रायव्हर आणि इतर कर्मचा-यांना या गोंधळाची माहिती मिळेपर्यंत ट्रेन विद्यापतीनगर बाहेरच्या सिग्नलवर पोहोचली होती. सोनपूर विभागातील वरिष्ठ अधिका-यांना आपली ही चूक लक्षात आल्यावर गाडी मूळ रुळावर आणणे शक्यच झाले नाही.
या घटनेमुळे सोनपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीलमणी यांनी बचवाडा रेल्वे स्थानकाच्या दोन सहाय्यक स्टेशन मास्टर्सना निलंबित केले. याशिवाय या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी बिरेंदर कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिलो. अमरनाथ एक्स्प्रेस दुस-या मार्गावर होती मात्र अधिका-यांच्या चुकीमुळे तिचा मार्ग बदलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पूर्व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी दोषींचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.