कोलकाता : मोखा चक्रीवादळ हळूहळू गंभीर रुप धारण करत आहे. हे चक्रीवादळ हळूहळू बांगला देश-म्यानमारच्या समुद्रकिना-याकडे सरकत असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. त्याचबरोबर चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर म्यानमार आणि बांगला देशमध्येही तयारी करण्यात आली आहे. सखल भागातील लोकांना बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हवामान विभागाने ट्वीट करत म्हटले आहे की, मोचा चक्रीवादळ केंद्र १२ मे २०२३ रोजी वायव्य पोर्ट ब्लेअरपासून सुमारे ५२० किमी अंतरावर मध्य बंगालच्या उपसागराच्या आग्नेय दिशेला होते. मोचा चक्रीवादळ रविवार दि. १४ मे रोजी बांगला देश-म्यानमार सीमेवर धडकू शकते. ताशी १७५ किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहत आहेत. एनडीआरएफच्या दुस-या बटालियनचे कमांडंट गुरमिंदर सिंग यांनी सांगितले की, मोचा चक्रीवादळाचे १२ मे रोजी तीव्र चक्रीवादळात आणि १४ मे रोजी अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल. त्याचवेळी भुवनेश्वरमधील आयएमडीचे वरिष्ठ अधिकारी संजीव द्विवेदी यांनी अंदाज वर्तवला आहे की, १२ मे रोजी संध्याकाळी मध्य बंगालच्या उपसागरावर त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
ईशान्येकडील राज्यांमध्ये परिणाम
या चक्रीवादळाचा परिणआम ईशान्येकडील राज्यांमध्ये दिसून येईल. त्रिपुरा आणि मिझोराममध्ये शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसाममध्ये रविवार १४ मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील चक्रीवादळाचे गांभीर्य लक्षात घेऊन एनडीआरएफने ८ पथके तैनात केली आहेत, तर २०० जवान बचावकार्यासाठी मैदानात उतरले आहेत. तसेच १०० जवानांना तयारीत ठेवण्यात आले आहे.
मच्छिमारांना इशारा
भारतीय हवामान विभागाने मच्छिमार, जहाजे, बोटी आणि ट्रॉलर यांना रविवारपर्यंत मध्य आणि ईशान्य बंगालचा उपसागर, उत्तर अंदमान समुद्रात जाऊ नये असे सांगितले आहे. तसेच बंगालच्या उपसागरात आणि उत्तर अंदमान समुद्रात जाणा-यांना किना-यावर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तत्पूर्वी, भारतीय तटरक्षक दलानेही मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला होता.