21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीय२०२४ मध्ये मोदींना बसू शकतो धक्का

२०२४ मध्ये मोदींना बसू शकतो धक्का

एकमत ऑनलाईन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली एक स्वतंत्र छबी तयार केली असून, त्यांच्या कामकाजावर जनता खुश आहे. त्यामुळे पंतप्रधान म्हणून त्यांना जवळपास ६३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. मात्र, त्यांच्यासमोर ५ आव्हाने अशी आहेत, जी आगामी ५ राज्यांच्या निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आव्हान निर्माण करू शकतात. त्यातच बिहारमधील सत्तांतराचा मोदी सरकारला मोठा फटका बसू शकतो, असे इंडिया टुडे आणि सी-व्होटर यांनी मूड ऑफ द नेशन या नावाने केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रापाठोपाठ बिहारमध्ये झालेल्या या सत्तानाट्यानंतर इंडिया टुडे आणि सी-व्होटर यांनी मुड ऑफ द नेशन या नावाने सर्व्हे केला. त्यामध्ये मोदी सरकारला हादरा देणा-या गोष्टी समोर आल्या आहेत. मुळात कोविड संकट, ४ महिने चाललेले शेतकरी आंदोलन, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि चीनसोबतच्या वादानंतरही व्यक्तीगत पंतप्रधान मोदी यांना पंतप्रधान म्हणून सर्वाधिक लोकांनी पसंती दिली. मात्र, यासोबतच त्यांच्यासमोर मोठे आव्हानेदेखील आहेत. पाच महिन्यानंतर मोदी सरकारला ८ वर्षे पूर्ण होणार आहेत. मात्र, ढासळलेली अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी याचा फटका मोदींना बसू शकतो. ५८ टक्के लोकांनी मोदींच्या कामकाजाला पसंती दिली आहे.

मात्र, २६ टक्के लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ४४ टक्के लोकांनी तर पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि बेरोजगारी हे मोदी सरकारचे अपयश असल्याचे म्हटले आहे. यासोबतच आणखी एक चिंतेचा विषय म्हणजे ६४ टक्के लोकांच्या मते मोदी पंतप्रधान झाल्यापासून आर्थिक स्थितीत कुठलाही बदल झालेला नाही. उलट स्थिती अधिक खराब झाली आहे. ५१ टक्के लोकांनी ६ महिन्यांत स्थिती सुधारेल, अशी कुठलीही शक्यता नसल्याचे म्हटले. याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकांसोबतच २०२४ च्या निवडणुकांत बसू शकतो.

याशिवाय राम मंदिर, कलम ३७० हटविण्याचा मुद्दा एवढा प्रभावी ठरू शकणार नाही. यासोबतच मोदींचे सरकार सुटा-बुटातील असल्याचा मुद्दाही मारक ठरू शकतो. ४७.७ टक्के लोकांच्या मते नोटबंदी, लॉकडाऊनचा फायदा उद्योजकांना झाला, तर छोटे, मध्य उद्योजक चिरडले गेले. याशिवाय ४३ टक्के लोक एअर इंडियाची विक्री, खाजगीकरणाच्या विरोधात आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांत याचाही फटका बसू शकतो.

या सर्वेक्षणात आता लगेचच लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटाला फार मोठा फटका बसू शकतो, असे म्हटले आहे. यासोबतच बिहारमध्ये नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडल्याने भाजपच्या तेथे २१ जागा कमी होऊ शकतात. मात्र, या सर्व्हेमध्ये मत नोंदवणा-यांनी मोदींनाच पसंती दिली आहे. ५३ टक्के जणांनी पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील, असा विश्वास व्यक्त केला, तर ९ टक्के जणांना राहुल गांधी पुढचे पंतप्रधान वाटत आहेत. केजरीवालांना ६ टक्के, योगी आदित्यनाथ यांना ५ टक्के आणि अमित शाह यांना ३ टक्के लोकांनी पसंती दिली.

…तर एनडीएला २८६ जागा
एनडीएला आज निवडणुका घेतल्या तर २८६ आणि यूपीएला १४६ जागा मिळतील. मुड ऑफ द नेशन जाणून घेण्यासाठी इंडिया टुडे सी-व्होटरने १,२२,०१६ जणांची मते जाणून घेतल्याचा दावा केला आहे. फेब्रुवारी २०२२ ते ९ ऑगस्ट २०२२ ही तारीख या सर्व्हेसाठी घेण्यात आली. कारण नितीश कुमार यांनी ९ ऑगस्टला भाजपची साथ सोडली.

आज निवडणुका झाल्यास
राज्यात यूपीएला ३० जागा!
सर्वेक्षण, शिंदे गट-भाजपलाही बसू शकतो मोठा फटका
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे गट-भाजपची सत्ता आली. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार आहेत. त्यामुळे राज्यात शिंदे गट-भाजपची ताकद वाढेल, असे राजकीय जाणकारांचे मत बनले होते. मात्र, इंडिया टुडे, सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून गंभीर बाब समोर आली.

या सर्वेक्षणानुसार आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात यूपीएला ३० आणि एनडीएला फक्त १८ जागा मिळतील, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या. यातल्या भाजपला २३ आणि शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. या सर्व्हेनुसार आता भाजपला स्वत:च्या जागाही टिकवता येणार नाहीत. शिंदेंच्या बंडामुळे आता भाजपकडे ४८ पैकी ३७ जागा आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या