नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी मागे हटायला तयार नाहीत. शेतक-यांच्या विविध संघटनांनी आज दुपारी दोन वाजता बैठक घेतली. या पूर्वी पंजाबच्या ३० शेतकरी संघटनांनी सकाळी ११ वाजता देखील बैठक घेतली. दुपारच्या बैठकीनंतर शेतक-यांनी पत्रकार परिषद आयोजित करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. शेतकरी आपली मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकवण्यासाठी आले आहेत. मोदींनी आपचे म्हणणे ऐकले नाही, तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असे शेतक-यांनी म्हटले. मोदींच्या ‘मुंह में राम और बगल में छुरी’ आहे आणि हे आम्हाला कदापि मंजूर नाही, असे शेतकरी म्हणाले.
शेतक-यांचे हे आंदोलन कोणत्याही एका राज्याचे नाही. हे आंदोलन एखाद्या शेतक-याचे देखील नाही, तर हे आंदोलन देशातील संपूर्ण शेतक-यांचे आंदोलन आहे, असे शेतक-यांनी म्हटले आहे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असे शेतकरी नेते म्हणाले. आमचे हे आंदोलन शांततेच्या मार्गानेच सुरू राहील आणि आम्ही मागे हटणार नाही, असे शेतकरी म्हणाले.केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांनी छेडलेले आंदोलन हे ऐतिहासिक आंदोलन आहे असे स्वराज इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे. ही लढाई शेतकरी आणि सत्तेची लढाई आहे असेही ते म्हणाले. हे आंदोलन भारताच्या लोकशाहीसाठी एक उदाहरणासारखे आहे, असेही ते म्हणाले. आजच्या दिवशी शेतक-यांना प्रश्न विचारण्याऐवजी सरकारलाच प्रश्न विचारायला हवेत असे ते म्हणाले. हे आंदोलन काही पंजाबच्याच शेतक-यांचे आंदोलन नाही, तर ३० शेतकरी संघटना हे आंदोलन करत आहेत. देशातील अनेक राज्यांमधील शेतकरी आपापल्या जिल्हा मुख्यालयांमध्ये आंदोलन करत आहेत, असेही योगेंद्र यादव पुढे म्हणाले.
दूध डेअरीच्या तेरा एकर जमिनीवर अनेकांचा डोळा