मुंबई : कडक उन्हामुळे सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे. यामुळे आतुरतेने वाट बघितली जात आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी मान्सूनला देशात दाखल होण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे २७ मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होणार असा हवामान विभागाचा अंदाज हुकण्याची शक्यता होती. मात्र, मोसमी वा-यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने केरळात मान्सून २७ मे रोजी दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
केरळमध्ये २७ मे रोजी मान्सूनची सुरुवात अपेक्षित असून, यंदा ९९ टक्के पाऊस अपेक्षित आहे. पुढील ५ दिवसांत कोकण आणि गोवा प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. राज्याच्या इतर भागातही हलका पाऊस पडेल, अशी माहिती मुंबईचे आयएमडी प्रमुख जयंता सरकार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
मान्सून तीन ते चार दिवसांपासून श्रीलंकेच्या किनारपट्टीसह परिसरात अडकला होता. त्यामुळे मान्सून २७ मे रोजी भारतात दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज चुकण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, मोसमी वा-यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने केरळात मान्सून २७ मे रोजी दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.