चंदीगड : युनायटेड किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी मोहाली ते चंदिगड असा मोर्चा काढला. शेतकरी पायी चंदीगडकडे जात आहेत. मोहाली पोलिसांनी लावलेला पहिला बॅरिकेड त्यांनी तोडला. मात्र, त्यांना मोहाली पोलिसांनी दुस-या बॅरिकेडवर अडवले. त्यावेळी काही तरुण शेतकरी चंदीगडमध्ये प्रवेश करण्याच्या त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. मुख्यमंत्री मान यांना भेटण्याचा शेतक-यांचा इरादा आहे.
पोलिसांनी अडवल्यानंतर शेतकरी धरणे धरून बसले आहेत. सकाळी शेतक-यांना मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या भेटीसाठी बोलावले होते. मात्र, नंतर शेतक-यांना भेटण्याऐवजी ते दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांची दिल्ली भेट पूर्वनियोजित होती, असे सरकारचे म्हणणे आहे. तर शेतकरी अधिका-यांशी बोलायला तयार नाहीत.
मोहालीला लागून असलेली सीमा सील
जोपर्यंत सरकार बोलणार नाही, तोपर्यंत येथे मोर्चा घेऊन बसणार असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. शेतक-यांना चंदीगडमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी चंदीगड पोलिसांनी मोहालीला लागून असलेली सीमा सील केली आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीसह पोलिस कोणालाही चंदीगडमध्ये येऊ देणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. शेतकरी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या भेटीवर ठाम आहेत. जिथे पोलिस बॅरिकेड्स लावून अडवतील तिथेच मोर्चा काढणार असल्याचेही शेतक-यांनी जाहीर केले आहे.
आप सरकारविरोधात संघर्ष करणार
मोहालीतील गुरुद्वारा अंब साहिब येथे शेतकरी जमले आहेत. त्यांनी घरून रेशनही आणले आहे, जेणेकरून चंदीगडमध्ये ठोस मोर्चा काढता येईल. युनायटेड किसान मोर्चाच्या शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता शेतकरी आप सरकारविरोधात मोठा संघर्ष सुरू करणार आहेत.