नवी दिल्ली : संसदेत खासदार व अन्य राजकीय नेत्यांना मिळणारे स्वस्तातील जेवण आता बंद होणार आहे. स्वस्त जेवणाबाबतचे अनुदान बंद केल्याची घोषणा लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी केल्याने माननीयांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे लोकसभा सचिवालयाचे दरवर्षी किमान ८ कोटी रुपये बचत होणार असल्याची माहिती लोकसभा सचिवालयातील सुत्रांनी दिली आहे. संसदेतील कॅन्टीन यापुर्वी उत्तर रेल्वेकडून चालवले जात होते. मात्र आता ते आयटीडीसीकडून चालविण्यात येईल, असेही बिर्ला यांनी सांगितले. संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरु होणार असून त्यापार्श्वभुमीवर बिर्ला यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी या निर्णयाची माहिती दिली.
वेतन भरपूर; जेवण स्वस्त
संसद सदस्यांना दरमहा मिळणारे वेतन हे देशातील अनेक कॉर्पाेरेट कंपन्याच्या अधिका-यांप्रमाणे आहे. एका खासदाराला सर्व भत्त्यांसह दरमहा कमीतकमी २ लाख रुपयांचे वेतन मिळते. मात्र असे असताना ही त्यांना संसदेतील कॅन्टीनमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ हे इतक्या कमी दराने मिळत होते की देशातील कोणत्याही गाव-वाडीतही इतक्या कमी दराने मिळत नसतील. उत्तम दर्जाचा चहा केवळ १ रुपयाला मिळत असे तर संपुर्ण जेवण फक्त १२ रुपयांना मिळत होते. गलेलठ्ठ पगारासह अनेक भत्ते असणाºया खासदारांच्या या फाजील लाडाबद्दल गेल्या काही वर्षांपासून सोशल मिडीया व अन्य प्रकारे निषेधाचा सूर ऐकू येत होता. काही खासदारही वारंवार इतक्या सवलतीच्या दरांबद्दल निषेध व्यक्त करीत होते. २०१५ पासून ही सेवा बंद करण्याच्या मागण्या अधूनमधून केल्या जात होत्या. अखेर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून हे फाजील लाड बंद होाणार आहेत.
संसद कॅन्टीनमधील खाद्य पदार्थांचे दर
पदार्थ – दर
चहा – १ रुपये
सुप – ५.५०
डाळवाटी -१.५०
शाकाहारी थाळी -१२.५०
मांसाहारी थाळी – २२
दहीभात -११
शाकाहारी पुलाव – ८
चिकन बिर्याणी -५१
मच्छी भाजी व भात – १३
राजमा भात -७
टोमॅटो भात – ७
फिश फ्राय -१७
अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी व रुपरेषा
पत्रकारपरिषदेत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी घेण्यात येत असलेल्या उपाययोजना व कार्यक्रमांची रुपरेषाही सांगितली. सकाळच्या सत्रात ९ ते २ या काळात राज्यसभेचे कामकाज चालेल तर ४ ते ८ या काळात लोकसभेचे कामकाज चालेल. रोज एक तास प्रश्नोत्तराचा तास राहील, असेही बिर्ला यांनी सांगितले. अधिवेशन सुरु होण्यापुर्वी सर्व सदस्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी अशी सूचनाही त्यांनी दिली. कोरोना चाचणीसाठी प्रत्येक खासदाराच्या निवासस्थानावरच सोय केल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या प्रसाराला चीन व डब्ल्यूएचओे जबाबदार