नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रारने एक व्हीडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने दावा केला की, विकी मिड्डूखेडा प्रकरणानंतर गायक मुसेवालाने २ कोटी रुपयांच्या सेटलमेंटची ऑफर दिली होती, जी त्याने नाकारली. गोल्डी ब्रार कॅनडात कुठेतरी लपून बसल्याचे समजते.
व्हीडीओ कमी प्रकाशात शूट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हीडीओमध्ये गोल्डी चेहरा झाकून बोलत आहे. तो म्हणाला की मूसेवाला यांना शहीद म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मला व्हीडीओ शेअर करणे भाग पडले. ब्रार म्हणाला तो (मूसेवाला) शहीद नाही. त्याने आपल्या गाण्यांमधून आपली चांगली प्रतिमा केली. मात्र तो वारंवार चुका करत राहिला, ज्याची त्याला शिक्षा झाली. आम्ही न्यायासाठी भारतीय न्यायव्यवस्थेची वाट पाहिली नाही. कायदा सामान्य लोकांसाठी आहे, मोठे स्टार्स, राजकारणी आणि त्यांच्या मित्रांसाठी नाही असंही ब्रार याने म्हटले.