नवी दिल्ली : येत्या १८ जुलै रोजी देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रपतीपदानंतर लगेच उपराष्ट्रपतीपदासाठीही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कुणाला उभे करणार याबाबत विविध नावे पुढे येत आहेत.
महाराष्ट्रात अलीकडेच शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपाला यश आले. भाजपाने १०६ आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून आणखी एक खेळी होण्याची शक्यता आहे. भाजपाकडून माजी शिवसैनिक सुरेश प्रभू यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची बातमी आहे. अमित शाह आणि सुरेश प्रभू यांच्यात चर्चा झाली आहे.
४ महिन्यापूर्वी घेतला संन्यास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी राजकारणातून संन्यास घेणार असल्याचे जाहीर केले होते. यापुढे कोणतीही राजकीय निवडणूक लढवणार नाही. आता फक्त पर्यावरणासाठी काम करण्याची इच्छा आहे असे सुरेश प्रभू यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते.