नवी दिल्ली : सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकासाठी अजून बराच काळ बाकी आहे. पण, अनेक पक्षांनी यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपकडून नरेंद्र मोदीच पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार आहे. पण, कधी-कधी मोदी निवृत्त होऊन इतरांना संधी देतील अशी दबक्या आवाजात चर्चा असते. पण, आता स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच नरेंद्र मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.
बिहारच्या पाटणा येथे भारतीय जनता पक्षाच्या सर्व आघाड्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीच्या समारोपानिमित्त बोलताना अमित शाह म्हणाले की सन २०२४ मध्ये भाजप-जेडीयू एकत्र निवडणुका लढवतील आणि नरेंद्र मोदी हेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. यावेळी अमित शहांनी भाजप कार्यकर्त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
९ ते १२ ऑगस्ट समर्पित करा
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीची भावना देशभर नेण्यासाठी शाह यांनी कार्यकर्त्यांना ९ ते १२ ऑगस्ट असे चार दिवस समर्पित करण्यास सांगितले आहेत. तसेच, पक्षाच्या कार्यकर्त्यांना २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे ते म्हणाले. या बैठकीला केरळ, तामिळनाडू, मिझोराम आणि मेघालय यासारख्या दूरच्या राज्यांसह देशभरातील ६०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.