25 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home राष्ट्रीय कृषी विधेयकांच्या विरोधात कॉंग्रेसचे देशव्यापी आंदोलन

कृषी विधेयकांच्या विरोधात कॉंग्रेसचे देशव्यापी आंदोलन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कृषीविषयक विधेयकांविरोधात विरोधी पक्षांकडून निषेध सुरूच आहे. सरकारकडून लोकसभेत गुरुवारी मांडण्यात आलेल्या तीन कृषीविषय विधेयके शेतकरीविरोधी असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. आता संसदेपासून ते रस्त्यापर्यंत या विधेयकांविरुद्ध कॉंग्रेस पक्षाने आवाज उठवला आहे. कृषीविषयक विधेयके आणि अध्यादेशांविरोधात कॉंग्रेस देशभरात निदर्शने करणार आहे.

कृषीविषयक विधेयकाविरोधात विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी कॉंग्रेस समविचारी पक्षांशी चर्चा करत आहे. कृषीविषयक विधेयकास एकत्रितपणे विरोध केला पाहिजे. रस्त्यावर उतरण्यापासून ते ते सोशल मीडियामधून निषेध अधिक तीव्र करण्याची तयारी कॉंंग्रेस पक्ष करत आहे. जे पक्ष कृषी विधेयकाला विरोध करत आहेत, त्यांना कॉंग्रेसने सोबत येण्याचे आवाहन केले आहे.

कृषी संबंधित दोन विधेयकांवरून वाद सुरू आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले असून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करत आहेत. पण विरोध होऊनही मोदी सरकार माघार घ्यायला तयार नाही. लोकसभेत ही तीन विधेयके मंजूर झाली आहेत. शेतक-यांची मोठी संघटना किसान भारतीय युनियन ही कृषी विधेयकांविरोधात उतरली असून शेतकरी आपल्या मार्गाने आंदोलन करतील, असे संघटनेचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनी सांगितले.

सरकारच्या कृषीविषयक विधेयकांमुळे कॉर्पोरेट क्षेत्राकडून शेतक-यांची पिळवणूक होईल. यामुळे केंद्र सरकारच्या विधेयकाविरोधात सर्वांनी एकजुटीने आंदोलनात उतरावे. येत्या २४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबरपर्यंत रेल रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समितीने दिला आहे.

राहुल गांधींचे टीकास्त्र
राहुल गांधी यांनी आधीपासूनच कृषीविषय विधेयकावरून सरकार विरोधात भूमिका घेतली आहे. मोदींनी शेतक-यांना उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. पण मोदी सरकारचे काळे कायदे शेतकरी आणि शेतमजुरांचे आर्थिक शोषण करण्यासाठी केले जात आहेत. हे जमीनदारीचे एक नवीन रूप आहे आणि मोदीजींचे काही मित्र नव्या भारताचे जमीनदार असतील. कृषी बाजार हटवला तर देशाची अन्न सुरक्षा मिटेल, असा इशारा राहुल गांधी यांनी ट्विट करून दिला आहे.

अध्यादेशांमुळे शेतक-यांचा फायदा : मोदी
कृषी क्षेत्राशी संबंधित तीन विधेयकांविरोधात शेतक-यांचे आंदोलन सुरूच आहे. तीव्र विरोध असूनही केंद्र सरकार माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिहारला अनेक प्रकल्पांची भेट देत कृषी विधेयकांचा उल्लेख केला. काही पक्ष शेतक-यांंमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या अध्यादेशांमुळे शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

चक्रवाढ व्याजातून कर्जदारांची सुटका?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या