पाटणा : बिहार निवडणुका जिंकल्यानंतर नितीश कुमार यांनी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मंगळवारी नितीश कुमार सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेणार आहेत. नितीश कुमारांबरोबर एनडीएतील मित्र पक्षांच्या 14 मंत्र्यांनाही राज्यपालांनी शपथ दिली. त्यानंतर आता बिहार विधानसभेसाठी हंगामी अध्यक्षांची लवकरच निवड केली जाणार आहे. 23 नोव्हेंबरला बिहारच्या नव्या विधानसभेचे पहिले अधिवेशन होणार आहे.
नितीशकुमार यांनी सर्वानुमते रालोआच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर रविवारी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला होता. ६९वर्षीय नितीशकुमार हे २००५ पासून कायम मुख्यमंत्री राहिले आहेत. अपवाद केवळ २०१४-१५ सालचा. त्यावेळी जतीनराम मांझी यांच्याकडे काही काळ मुख्यमंत्रिपद होते. यापूर्वी श्रीकृष्ण सिंग हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले होते. त्यांचा विक्रम मोडण्याचा मान नितीशकुमार यांच्याकडे राहील.
नितीशकुमार यांच्यासह जेडीयूकडून विजय कुमार चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी, मेवालाल चौधरी आणि शीला कुमारी, भाजपकडून तारकिशोर प्रसाद, रेणू देवी, अमरेंद्र प्रतापसिंह, मंगल पाण्डेय, रामसूरत राय, रामप्रीत पासवान, जीवेश मिश्रा आणि ‘हम’कडून संतोष कुमाल सुमन तसेच मुकेश सहानी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. 10 नोव्हेंबर रोजी बिहार निवडणुकीचा निकाल लागला होता. या निवडणुकीत राजदला सर्वाधिक म्हणजे 75 तर भाजपला 74 जागा मिळाल्या होत्या. एनडीएला बिहार निवडणुकीत बहुमत मिळाल्याने अखेर नितीश कुमार यांनी राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यानुसार आज नितीश कुमार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह राजभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
रालोआचे कुटुंब प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करेल- मोदी
रालोआचे कुटुंब बिहारच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे अभिनंदन करताना दिली आहे. बिहारच्या कल्याणासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी नितीशकुमार यांना पाठविलेल्या ट्वीटमध्ये दिले आहे. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमारजी यांचे अभिनंदन. बिहार सरकारमधील सर्व मंत्र्यांचे अभिनंदन. बिहारच्या विकासासाठी रालोआचे कुटुंब एकजुटीने कार्य करेल, असे मोदींनी म्हटले.
देशात २४ तासांमध्ये ४३, ८५१ जण करोनामुक्त