35.2 C
Latur
Monday, March 8, 2021
Home राष्ट्रीय राज्यासह परराज्यांत प्रवासासाठी 'ई-पास'ची गरज नाही : केंद्र सरकार

राज्यासह परराज्यांत प्रवासासाठी ‘ई-पास’ची गरज नाही : केंद्र सरकार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेले ५ महिने कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाला प्रातिबंध म्हणून ३१ मे पर्यंत देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. यानंतर, जूनपासुन देशात अनलॉकची घोषणा केल्यानंतर टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ‘पुनःश्च हरिओम’ म्हणत ‘मिशन बिगीन अगेन’ ची घोषणा केली होती.

आता, जनजीवन पूर्वपदावर येत असताना अनेक सामान्य लोकांना प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. तर, गेल्या काहीच दिवसांपूर्वी राज्यातील राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसची देखील आंतरजिल्हा सार्वजनिक वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मात्र, खाजगी वाहनाने प्रवास करायचा असल्यास ई-पासची असलेली सक्ती राज्य सरकारतर्फे कायम ठेवण्यात आली आहे.यामुळे, स्वतःच्या वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तसेच इतर पक्षातील नेत्यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला होता.दरम्यान, केंद्र सरकारकडून अनलॉक 3 मध्ये बरेच निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र, अनेक राज्यांमध्ये अद्यापही नियमांमध्ये शिथीलता देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांकडे विचारणा केली आहे की सध्याच्या अनलॉक-3 मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे व्यक्ती आणि वस्तू व सेवांच्या आंतरराज्यीय आणि आंतरराज्यीय हालचालींवर कोणतेही बंधन घालू नये.

सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिलेल्या निवेदनात केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले आहे, की विविध जिल्हा, राज्यांतून स्थानिक पातळीवरील हालचालींवर निर्बंध लादले जात आहेत. अशा निर्बंधांमुळे वस्तू आणि सेवांच्या आंतरराज्यीय समस्या निर्माण होत आहेत. पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे, परिणामी आर्थिक कामे व रोजगार विस्कळीत होण्याव्यतिरिक्त वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे केंद्राने म्हटले आहे.

त्यामुळे, केंद्राने जरी आता ‘ई-पास’ अथवा तत्सम परवान्याची गरज नसल्याचे सांगत राज्यांना निर्बंध हटवण्यास अनुकूलता दर्शवली असली तरी अंतिम निर्णय हा त्या-त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे आहे. महाराष्ट्र राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘ई-पास’चे बंधन हटवल्यास नागरिकांना अडचणीच्या काळात अथवा कामकाजासाठी खाजगी वाहनाने कराव्या लागणाऱ्या प्रवासात दिलासा मिळेल.

रायुडू संघात असता तर भारताने २०१९ चा वर्ल्डकप जिंकला असता : रैना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या