नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त विधान करणा-या नुपूर शर्मा यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे.
अद्यापपर्यंत नुपूर शर्मा पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झालेल्या नाहीत. त्यामुळे वादग्रस्त विधान करून नुपूर शर्मा अखेर कुठे गेल्या? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून गेल्या चार दिवसांपासून दिल्लीमध्ये शोध घेतला जात आहे. रझा अकादमीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी नुपूर शर्माविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या सूत्रांनुसार, भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. परंतु, त्या नॉट ट्रेसेबल असल्याने त्यांचा शोध घेता येत नाही. वादग्रस्त विधानानंतर शर्मा यांच्या विरोधात मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय ठाणे पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, शर्मा यांना समन्स बजावल्यानंतर योग्य कारवाईसाठी दिल्ली पोलीस सहकार्य करत नसल्याचे म्हटले असून, शर्मा यांचा शोध घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या कामामध्ये दिल्ली पोलिसांनीही सहकार्य कारावे असेही वळसे पाटील यांनी म्हटले आहे. एका टीव्ही चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर देशभरात शर्मांविरोधात निदर्शने करण्यात आली होती. याशिवाय कतार, पाकिस्तान, इराण, इराकसह १४ देशांनी शर्मा यांच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली होती. वादग्रस्त विधानानंतर भाजपने नुपूर यांना निलंबित केले आहे.