गुरुग्राम : भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे उठलेले वादंग अद्याप शांत झालेले नाही. आता या वादात भीम आर्मीनेही उडी घेतली आहे. नूपुर शर्मा यांची जीभ कापणा-याला एक कोटीचे बक्षीस देण्याची घोषणा भीम आर्मीचे प्रमुख नवाब सतपाल तंवर यांनी बुधवारी (दि. ८) केली. कानपूर हिंसाचाराची सूत्रधार नूपुर शर्मा असल्याचा आरोप भीम आर्मीने केला आहे.
नूपुर शर्मा यांनी पैगंबराचा अपमान केला आहे. ज्यामुळे करोडो मुस्लिम समाज दुखावला गेला आहे. मोदी सरकार मुद्दाम नूपुर शर्माला अटक करीत नाही आहे. नूपुर शर्मा ही कानपूर दंगलीची खरी सूत्रधार आहे. योगी सरकारने त्यांना आरोपी का बनवले नाही, असा सवाल भीम सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष नवाब सतपाल तन्वर यांनी केला.
नूपुर शर्मासारख्या नेत्याला समाजात राहण्याचा अधिकार नाही. त्यांना तात्काळ तुरुंगात पाठवावे किंवा देशाबाहेर हाकलून द्यावे. नूपुर शर्मा यांनी केलेल्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जगभर भारताची बदनामी होत आहे, असेही सतपाल तंवर म्हणाले.