नवी दिल्ली : देशात विरोधक बेरोजगारी आणि महागाईवर भांडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी गुजरातच्या रोजगार मेळाव्याला संबोधित केले.
आजच्या कार्यक्रमामुळे हजारो कुटुंबांसाठी होळी या महत्त्वाच्या सणाचा आनंद अनेक पटींनी वाढला आहे. गुजरातमध्ये अल्पावधीतच दुस-यांदा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यासाठी मी मुख्यमंत्री भूपेंद्रभाई आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले गुजरातमध्ये गेल्या पाच वर्षात दीड लाख नोक-या देण्यात आल्या. याव्यतिरिक्त गुजरातमधील १८ लाखांहून अधिक तरुणांना एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे मोदी म्हणाले.
गुजरात सेमीकंडक्टरचे केंद्र बनणार
मोदी म्हणाले, आम्ही गुजरातमधील दाहोद येथे २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने रेल्वे इंजिन कारखाना सुरू केला आहे. गुजरातही सेमीकंडक्टरचे केंद्र बनणार असून या प्रकल्पांमुळे हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
देशात ९० हजारहून अधिक स्टार्टअप्स
स्टार्टअप्सचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की आमच्या देशात ९० हजारहून अधिक स्टार्टअप्स आहेत. मला आनंद आहे की केंद्र सरकारचे सर्व विभाग आणि एनडीएची राज्य सरकारे जास्तीत जास्त नोक-या देण्यासाठी सतत कार्यरत आहेत. सातत्याने रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत.