नाशिक : श्रीलंकेतील आर्थिक आरिष्टामुळे यंदा कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने कांदा आयात बंदीची संक्रांत टळण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
दुसरीकडे बांगलादेश, मलेशिया आणि सिंगापूरच्या आयातदारांनी आणखी दहा दिवस पुरेल इतका कांदा खरेदी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांना कांद्यासाठी क्विंटलला सरासरी एक हजार रुपयांवर समाधान मानावे लागत आहे.
उत्तर भारतामध्ये सुरु झालेला श्रावण, पावसामुळे वाहतुकीचा मंदावलेला वेग, मागणीचा अभाव या कारणास्तव उन्हाळ कांद्याला अपेक्षित भाव न मिळण्याची स्थिती मध्यंतरी तयार झाली होती. आता दक्षिणेतील कांद्याचे उत्पादन कसे राहणार? याकडे शेतक-यांच्या नजरा खिळल्या आहेत.
दक्षिणेतील कांद्याचे पावसाने वांदे केल्याने गेल्या दोन वर्षांमध्ये उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळाला होता. आता दक्षिणेत कांद्याचे उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत कमी असल्याची व्यापा-यांना माहिती मिळाली आहे. तरीही ऑगस्टऐवजी सप्टेंबरमध्ये दक्षिणेतील कांदा बाजारात येऊ शकतो, असा निर्यातदारांचा अंदाज आहे. मध्यप्रदेशमध्ये कांद्याचे ३० टक्के अतिरिक्त उत्पादन असून तेथील शेतक-यांनी कांदा साठवून ठेवला आहे.
महाराष्ट्रातील शेतक-यांचा उन्हाळ कांदा साठवणुकीकडे कल राहिला आहे. गेल्या काही महिन्यात शेतक-यांना कांद्याला किलोला किमान एक रुपया, तर सरासरी ५ ते १० रुपये मिळाले. शेतक-यांच्या म्हणण्यानुसार कांद्याचा उत्पादन खर्च २२ ते २५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.