25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeराष्ट्रीयवेगवान रेल्वेतून फक्त वातानुकूलित प्रवास

वेगवान रेल्वेतून फक्त वातानुकूलित प्रवास

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांना त्यांच्या निश्चित ठिकाणी वेगाने प्रवास करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक मोठी योजना आखली आहे. त्यानुसार ताशी १३० ते १६० कि.मी. वेगाने धावणा-या मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांत आता बिगर एसी म्हणजेच स्लीपर आणि जनरल कोच राहणार नाहीत. त्यामुळे या रेल्वेतून सर्व प्रवाशांना वातानुकूलित डब्यातून प्रवास करता येणार आहे.

अर्थात, ताशी १३० कि.मी. किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने धावणा-या मेल किंवा एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांमध्ये बिगर एसी कोच तांत्रिक समस्या निर्माण करतात. त्यामुळे वेगाने धावणा-या सर्वच रेल्वेगाड्याचे स्लीपर कोच काढून टाकण्यात येणार आहेत. लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेमध्ये तूर्त ८३ वातानुकूलित डबे बसविण्याचा प्रस्ताव आहे. याचा अर्थ आता बिगर वातानुकूलित कोच असणार नाहीत, असे नाही. मात्र, बिगर वातानुकूलित म्हणजेच स्लीपर कोचच्या गाड्यांचा वेग कमी राहील. म्हणजेच अशा रेल्वेगाड्या ताशी ११० कि.मी. वेगाने धावतील. मात्र, हा बदल टप्प्याटप्प्याने केला जाईल. एवढेच नव्हे, तर नव्या अनुभवातून धडा घेऊन पुढील पावले टाकले जातील, असे रेल्वे मंत्रालयाने सांगितले.

यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते डी. जे. नारायण म्हणाले की, रेल्वे मंत्रालयाने ही जी योजना आखली आहे, याबद्दल गैरसमज करून घेऊ नये. सर्वच रेल्वेगाड्यांचे एसी डब्यांत रुपांतर केले जाणार नाही. खरे तर सध्या देशात अधिकाधिक मार्गावर धावणा-या मेल, एक्स्प्रेस गाड्या ताशी ११० किंवा त्यापेक्षा कमी वेगाने धावतात. राजधानी, शताब्दी आणि दुरंतो यासारख्या आघाडीच्या रेल्वेगाड्यांचा वेगदेखील ताशी १२० कि.मी. आहे. त्यामुळे वातानुकूलित गाड्यांची संख्या तुलनेने कमी असेल. खास प्रवाशांच्या फायद्याचा विचार करूनच हा बदल स्वीकारण्यात आला असून, यात तांत्रिक बाबीदेखील लक्षात घेतल्या आहेत.

ठराविक मार्गावर वातानुकूलित रेल्वे
रेल्वेचे प्रवक्ते डी. जे. नारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला ठराविक मार्गावर या वातानुकूलित डबे असलेल्या वेगवान रेल्वे धावणार आहेत. त्यासाठी सुवर्ण चतुर्भुज आणि डायगोनलचे रेल्वे रुळ नव्याने बसविण्यात येत आहेत. जेणेकरून या मार्गावर ताशी १३० ते १६० कि.मी. वेगाने रेल्वे धावतील आणि ज्या गाड्या ताशी १३० ते १६० कि.मी. वेगाने धावतील, त्याच गाड्यांचे सर्व रेल्वे डबे वातानुकूलित असतील. याचा प्रवाशांना लाभ होईल. ज्या गाड्या ताशी ११० कि.मी. वेगाने धावतील, त्या गाड्यांमध्ये बिगर वातानुकूलित डबे असतील.

एसी कोचचे भाडे बिगर एसीप्रमाणेच
सध्या ८३ बर्थच्या कोचला डिझाईन केले जात आहे. चालू वर्षात असे एकूण १०० कोच बनविण्याची योजना आहे आणि पुढील वर्षी २०० कोच तयार होतील. या कोचची प्रथम ट्रायल घेतली जाईल आणि त्यातून येणा-या अनुभवानुसार त्यात बदल केले जातील. विशेष म्हणजे नवे एसी कोचमधील प्रवास फार महाग असणार नाही, तर एसी थ्री आणि स्लीपर कोच यातील मध्य काढून किमान दर ठेवले जातील, असे नारायण म्हणाले.

कपूरथला येथे विशेष कोचची होतेय निर्मिती
वेगवान रेल्वेच्या विशेष एसी कोचची निर्मिती कपूरथला येथील रेल्वे कोच फॅक्टरीत होत आहे. या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी तिकीट दर सर्वसाधारण राहील आणि प्रवाशांना प्रवासासाठी चांगल्या, आरामदायी सुविधा देण्याबाबतही विचार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अशा रेल्वेगाड्यांमधून प्रवास केल्यास प्रवाशांची वेळ बचत होण्यास मदत होणार आहे.

किसान ट्रेन ठरणार ‘गेमचेंजर’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या