22.9 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयनगरोटामागे पाकिस्तानच

नगरोटामागे पाकिस्तानच

पुराव्यांवरून खुलासा ; मसूद अझरच्या भावाकडून दहशतवाद्यांना सूचना

एकमत ऑनलाईन

नगरोटा : जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. हे दहशतवादी पाकिस्तानचे होते. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, हे सर्व दहशतवादी जिल्हा विकास परिषद (डीडीसी) निवडणुकीवेळी मोठा हल्ला करण्याच्या उद्देशाने पाठविण्यात आले होते. तसेच, हे दहशतवादी पाकिस्तानमधील जैशचा प्रमुख मसूद अझरचा भाऊ रऊफ लाला याच्यासोबत सतत संपर्क साधत होते. ज्यावेळी या दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला, त्यावेळी रऊफ लाला या सर्व दहशतवाद्यांना सूचना देत होता, असे तपास यंत्रणांनी सांगितले.

दहशतवादीही पाकिस्तानीच
चकमकीत ठार झालेले दहशतवादी पाकिस्तानहून पाठविण्यात आले होते व तेथून त्यांना सूचनाही देण्यात आल्या असल्याचा आता पुरावा आता तपास यंत्रणांना मिळाला आहे. दहशतवाद्यांकडून पाकिस्तानच्या एका कंपनीचा डिजिटल मोबाइल रेडिओ (डीएमआर) तपास यंत्रणेला सापडला आहे. इतकेच नाही तर दहशतवाद्यांकडे सापडलेल्या मोबाइलवरील मेसेजेस पाहिल्यानंतर हेही स्पष्ट झाले की, दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या मार्गदर्शकांच्या सतत संपर्कात होते. हे संदेश पाकिस्तानच्या शकरगडहून पाठविण्यात आल्याची तपास यंत्रणेला शंका आहे.

दहशतवाद्यांचे बुट ‘कराची मेड’
गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, डिजिटल मोबाइल रेडिओ पाकिस्तानस्थित मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स कंपनी तयार करते. दहशतवाद्यांच्या मोबाइलवरील मेसेज पाहिल्यानंतर हे स्पष्ट झाले की, पाकिस्तान पुन्हा एकदा भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा विचार करीत होता. यासह तपास यंत्रणांना सापडलेल्या दहशतवाद्यांचे शूज पाकिस्तानच्या कराचीमध्ये तयार करण्यात आले आहेत. यासह वायरलेस सेट व एक जीपीएस डिव्हाइसही जप्त करण्यात आला आहे, ज्यांच्या तपासणीत ही सर्व उपकरणे पाकिस्तानातून घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

शक्करगडमध्ये दिसला होता रऊफ लाला
सुत्रांच्या माहितीनुसार, रऊफ लाला काही दिवसांपूर्वी जम्मूमधील सांबा येथे आणि पाकिस्तानच्या शक्करगडमधील हिरानगर सेक्टरमध्ये दिसला होता. ३१ जानेवारीला सुद्धा रऊफ लाला याने अशाचप्रकारे दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याचा कट रचला होता, परंतु सुरक्षा दलाने या दहशतवाद्यांना बन टोल प्लाझाजवळ घेरुन त्यांचा खात्मा केला होता.

पाकिस्तानी उच्चायुक्तांना समन्स
जम्मू काश्मीरमधील नगरोटा भागात चार दहशतवाद्यांच्या एन्काउन्टरनंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक धोरण स्वीकारले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स धाडले आहे. नगरोटामध्ये एन्काउन्टरमध्ये ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून अनेक ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यावरुन पाकिस्तानला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. ठार झालेले चारही जण दहशतवादी ‘जैश ए मोहम्मद’ या संघटनेशी निगडीत होते. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधात एक उच्चस्तरीय बैठक बोलवून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी, त्यांनी सुरक्षा दलाच्या समयसूचकतेचे कौतुकही केले होते.

ट्रम्प यांच्या मुलाला कोरोना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या