अहमदाबाद : प्रायोगिक प्रकल्पांतर्गत पहिल्यांदाच भारतीय टपाल विभागाने गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात ड्रोनच्या मदतीने पार्सल पोहोचवले. या ड्रोनने २५ मिनिटांत ४६ किलोमीटरचे अंतर कापल्याचे सांगितले जात आहे. पीआयबी अहमदाबादच्या म्हणण्यानुसार केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली हे पार्सल कच्छ जिल्ह्यातील भुज तालुक्यातील हबे गावातून भचाऊ तालुक्यातील नेर गावात पोहोचवण्यात आले. या पायलट प्रोजेक्टच्या यशामुळे भविष्यात ड्रोनद्वारे पार्सल पोहोचवणे शक्य होणार आहे.
पीआयबीने सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने, भारतीय टपाल विभागाने देशात प्रथमच ड्रोनच्या सहाय्याने कच्छ, गुजरातमध्ये पार्सल वितरणाची यशस्वी प्रायोगिक चाचणी घेतली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार ड्रोनला सुरुवातीच्या ठिकाणापासून ४६ किमी अंतरावर असलेल्या गंतव्यस्थानावर पार्सल वितरीत करण्यासाठी २५ मिनिटे लागली.
केंद्रीय संचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार या पार्सलमध्ये वैद्यकीय संबंधांचे साहित्य होते. पायलट प्रोजेक्टने विशेषत: ड्रोनद्वारे पार्सल एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहोचवण्याच्या खर्चाचा अभ्यास केला असून यासोबतच पार्सल पोहोचवण्याच्या कामात गुंतलेल्या कर्मचा-यांमधील समन्वयाचीही चाचणी या काळात झाली, असे प्रकाशनात म्हटले आहे.
अलिकडे ड्रोनचा वापर सर्रासपणे सुरू आहे. अर्थात उंचावरून छायाचित्रे घेण्यास ड्रोनची बरीच मदत होते. याशिवाय ब-याच गोष्टींसाठी ड्रोनची मदत होऊ लागली आहे. दुसरीकडे अतिरेकीदेखील पाक हद्दीतून भारतात शस्त्र पाठविण्यासाठी किंवा बॉम्ब पाठविण्यासाठी ड्रोनचा वापर करीत आहेत. मात्र, टपाल विभागाने पार्सल पाठविण्यासाठी ड्रोनचा प्रयोग यशस्वी करून दाखवत भविष्यात ड्रोनच्या मदतीने वेळेत पार्सल पोहोचवून सेवेची तत्परता दाखवून दिली जाऊ शकते, याची प्रचिती दिली. त्यामुळे या कामासाठी ड्रोनचा वापर वाढू शकतो.
पार्सल पाठविण्याचा प्रयोग झाला यशस्वी
चौहान यांनी ट्विट केले की देशात ड्रोन महोत्सव २०२२ साजरा होत असताना टपाल विभागाने गुजरातमधील कच्छमध्ये ड्रोनद्वारे पार्सल पाठवण्याचा यशस्वीपणे प्रयोग केला. ड्रोनने २५ मिनिटांत ४६ किलोमीटर अंतर कापून औषधाचे पार्सल यशस्वीपणे वाहून नेले.
पोस्टल पार्सल सेवेला येणार वेग
निवेदनानुसार प्रयोग व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाल्यास पोस्टल पार्सल सेवा अधिक वेगाने कार्य करू शकते. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पार्सल सेवा थेट मानवी मदतीने केली जाते. परंतु यांत्रिक युगात आता बरेच बदल झाले असून, आगामी काळात पार्सल पोहोचविण्यासाठी ड्रोनचा सर्रास वापर होऊ शकतो. अर्थात, व्यावसायिकदृष्ट्या याचा सक्षमपणे वापर केल्यास ग्राहकांची सोय आणि आर्थिक लाभही होणार आहे.