नवी दिल्ली : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू येथे कारगिल विजय दिवसानिमित्त सांगितले की, पाकिस्तान व्याप्त काश्मीर(पीओके) हा भारताचा एक भाग आहे आणि संसदेत या संदर्भात एकमताने ठरावही मंजूर करण्यात आला आहे. ते म्हणाले की, हे कसे शक्य असू शकते, बाबा अमरनाथ शिवाच्या रूपात भारतात आहेत मात्र देवी शारदाचे मंदिर पीओकेच्या पलीकडे आहे.
राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावर आता पाकिस्तानला मिरची लागली आहे. जम्मूमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी केलेले वक्तव्य अयोग्य आणि पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानने हे वक्तव्य पूर्णपणे फेटाळून लावले आणि त्याचा तीव्र निषेध केला. पाकिस्तानने म्हटले आहे की भारतीय नेत्याने बेकायदेशीरपणे पीओके जम्मू-काश्मीरवर अशी टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशी चिथावणीखोर विधाने आयआयओकेचे वास्तव बदलू शकत नाहीत. भारताने हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की, काश्मीर हा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर विवादित मुद्दा असून तो संयुक्त राष्ट्रांच्या अजेंड्यामध्ये आहे. आयआयओजेकेच्या लोकांना त्यांचा आत्मनिर्णयाचा अधिकार मिळवून देण्यासाठी पाकिस्तान नेहमीच त्यांना शक्य ती सर्व मदत करत राहील.
आंतरराष्ट्रीय समुदायाने पावले उचलावित : पाक
पाकिस्तानकडून प्रतिक्रिया देण्यात आली असून म्हटले की भारताने काश्मिरी लोकांवरील क्रूरता आणि आयआयओजेकेची लोकसंख्या संरचना बदलण्याचे बेकायदेशीर प्रयत्न रोखण्यासाठी पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय समुदायाने पावले उचलावीत असे आवाहनही पाकिस्तानने केले आहे. पाकिस्तान हा शांतता आणि स्थैर्याचा समर्थक आहे. त्याच वेळी, आम्ही कोणत्याही आक्रमक मनसुब्यांना हाणून पाडण्यास पूर्णपणे सक्षम आहोत आणि आम्ही अलीकडच्या काळात यासह अनेक प्रसंगी या संदर्भात आमचा संकल्प आणि क्षमता प्रदर्शित केली आहे.
पाकिस्तानला मिरची का लागली?
कारगिल विजय दिवस सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी जम्मूमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय लष्कराच्या हौतात्म्याचे स्मरण करून ते म्हणाले की, भारताच्या संसदेत पाकव्याप्त काश्मीरवर (पीओके) ठराव मंजूर करण्यात आला होता. पाकव्याप्त काश्मीर भारताचा एक भाग होता, आहे आणि राहील. हे कसे असू शकते की शिवाचे रूप असलेले बाबा अमरनाथ आपल्यासोबत आहेत आणि देवी शारदा शक्ती स्वरूप पीओके पलीकडे आहे. ते म्हणाले की, आज भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहे. आज भारत बोलतो तेव्हा जग ऐकते.