रांची : अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) झारखंडमधील आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांना मनी लाँड्रींग प्रकरणात अटक केली. त्यांना झारखंड उच्च न्यायालयात दाखल केले असता ईडीने न्यायालयात धक्कादायक माहिती दिली. फक्त एकाच नाहीतर अनेक शेल कंपन्यांकडून मनी लाँड्रींग करत होते. त्याचा वापर कर वाचविण्यासाठी किंवा भविष्यात हा पैसा कोणत्या गोष्टींसाठी कामात येईल या उद्देशाने हे मनी लाँड्रींग करण्यात आले, असे ईडीने न्यायालयात सांगितले.
झारखंड उच्च न्यायालयाने मंगळवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या खाण लीज, त्यांच्या कथित शेल कंपन्या आणि इतरांविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी घेतली. मनरेगा घोटाळ्यातील ईडी तपास आणि खाण सचिव पूजा सिंघल यांच्याविरुद्धच्या खटल्याचीही कोर्टात सुनावणी सुरू होती. आता या सर्व प्रकरणांवर १९ मे रोजी सुनावणी होणार आहे. यावेळी खुंटी जिल्ह्यातील मनरेगा घोटाळ्यासह इतर सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपविला जाऊ शकतो. कारण आम्ही पुरेसे पुरावे गोळा केले आहेत, असे ईडीने सांगितले.
दरम्यान, १५ मे रोजी अटक करण्यात आलेल्या खाण सचिव पूजा सिंघल आणि बनावट कंपन्यांच्या संबंधात ईडीने रवी केजरीवालची चौकशी केली होती. ईडी सूत्रानुसार, रवी केजरीवाल यांनी चौकशीदरम्यान हेमंत सोरेन आणि शेल कंपन्यांमधील संबंधांचा खुलासा केला. ईडीने न्यायालयाला असेही सांगितले की रवी केजरीवाल यांच्या वक्तव्यावरून अनेक शेल कंपन्यांचा मनी लॉन्डरिंगसाठी वापर करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणात एका प्रतिवादीचा सहभाग असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, रवी हे एकेकाळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या खूप जवळचे होते आणि पक्षविरोधी कारवायांसाठी पक्षातून काढून टाकण्यापूर्वी त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे खजिनदार म्हणून काम केले होते.
पूजा सिंघल या झारखंडच्या भूविज्ञान विभागाच्या सचिव तसेच झारखंड राज्य खनिज विकास महामंडळ लिमिटेड च्या बाँड संचालक होत्या, त्यांनी २००९ ते २०१० दरम्यान राज्याच्या खुंटी जिल्ह्याचे उपायुक्त म्हणून काम केले होते. त्यांना ११ मे रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर सरकारने १२ मे रोजी त्याला निलंबित केले होते. त्यांच्या अटकेनंतर रांचीच्या विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती.