नवी दिल्ली : ड्रोन तंत्रज्ञान हा भारतातील एका मोठ्या तांत्रिक क्रांतीचा आधार बनत असून भारतात रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात ड्रोन उद्योगाकडून फार मोठ्या शक्यता आहेत. शेतीपासून, प्रशासन, कायदा सुव्यवस्था व अंतरिक्ष तंत्रज्ञान पर्यंत अनेक क्षेत्रांत ड्रोनच्या फायद्यांची महती अद्भुत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दि. २७ मे रोजी सांगितले. आधीच्या सरकारांनी तंत्रज्ञान ही अडचण मानल्याने देशाचे मोठे नुकसान झाले असाही त्यांनी आरोप केला.
प्रगती मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या प्रदर्शनात विविध क्षेत्रात उपयुक्त असलेल्या ड्रोनच्या १५०० निर्मात्या उद्योजकांनी सहभाग घेतला आहे. उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी ड्रोनचा वापर करणा-या काही शेतक-यांबरोबरही संवाद साधला.
पंतप्रधानांनी हेही नमूद केले की ड्रोन तंत्रज्ञान व याच्या फायद्यांबाबत भारतात आज जो उत्साह व उर्जा दिसत आहे ती आगामी काळातील या क्षेत्राच्या मोठ्या प्रगतीचे निदर्शक आहे. याचे महत्व तरूण पिढीला सर्वांत आधी लक्षात आले आहे. २०१४ च्या आधी प्रशासनात तंत्रज्ञानाच्या वापराबाबत व्यापक उदासीनता होती. शासकीय स्तरावरूनच अशी उदासीनता असल्याने ड्रोन तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष कामकाजातील वापराबाबतही उदासीनताच होती. मात्र या दृष्टिकोनामुळे सर्वात मोठे नुकसान गरीब, वंचित व मध्यम वर्गाचे झाले. ड्रोन तंत्रज्ञानाबाबत देशवासीयांमध्ये आज जो उत्साह दिसतो आहे तो विलक्षण आहे. देशाच्या रोजगारनिर्मितीत ड्रोन उद्योग मोठी भूमिका बजावणार आहे.
पंतप्रधान स्वामित्व योजनेत पहिल्यांदाच देशातील गावांतील मालमत्तांचे डिजीटल मॅपींग करण्याची योजना सरकारने आखली. त्यातही ड्रोन तंत्रज्ञानाची अतिशय महत्वाची मदत होत आहे असे मोदींनी सांगितले. उत्तराखंडमधील केदारनाथ धानच्या विकासाची योजना सुरू झाली तेव्हा आपण दिल्लीतून ड्रोनच्या सहाय्याने या योजनेचे निरीक्षण व पाहणी करत होतो. एखाद्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रत्येक वेळी प्रत्यक्ष तेथेच जायला पाहिजे हे आज गरजेचे राहिलेले नाही व हे ड्रोनसारख्या तंत्रज्ञानांमुळे शक्य झाले आहे.
महोत्सवाची वैशिष्ट्ये-
– देशातील सर्वांत मोठा ड्रोन महोत्सव.
– देशी विदेशी १६०० ड्रोन निर्मात्यांची ७० दालने.
– कृषी, खाणकाम, पायाभूत सुविधा, गुप्तचर माहिती, आपत्कालीन मदत, वाहतूक, जिओ मॅपिंग, संरक्षण, कायदा सुव्यवस्था आदी क्षेत्रांतील ड्रोनच्या महत्वाचे वर्ण करणारी चलचित्र प्रदर्शने.
– ड्रोन प्रात्यक्षिके, पॅनल चर्चा व मेड इन इंडिया ड्रोन टॅक्सीचे मॉडेल पाहण्याची संधी.