नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत संसदेत ९९.१८ टक्के मतदान झाले. तसेच राज्यांमधूनही आमदारांनी बहुसंख्येने मतदान केले. भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू आणि विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात ही लढत झाली असून, या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याचा फैसला उद्या गुरुवारी होणार आहे. विरोधी पक्षांत फाटाफूट झाल्याने मुर्मू यांचेच पारडे जड मानले जात असून, आता फक्त औपचारिकता बाकी असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात सोमवार, दि. १८ जुलै रोजी झाली. त्याच दिवशी राष्ट्रपतिपदासाठी मतदान पार पडले. त्यामुळे संसदेत हजर असलेल्या ९९ टक्के खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच आमदारांनी मतदान केले. या निवडणुकीत विरोधी पक्षातील शिवसेना, झामुमोने मुर्मू यांना पाठिंबा दिला, तर विरोधी पक्षातील ब-याच आमदार, खासदारांनी पक्षाची भूमिका बाजूला ठेवून मुर्मू यांना मतदान केले. आता याचा फैसला गुरुवारी (दि. २१) होणार आहे. त्यानंतर२५ जुलै रोजी शपथविधी होईल..
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ४८०० खासदार आणि आमदारांनी मतदान केल्याचे सांगण्यात आले होते. त्यात लोकसभा आणि राज्यसभेचे ७७६ खासदारांचा समावेश होता. खासदारांच्या मतांचे एकूण मूल्य ५ लाख ४३ हजार २०० एवढे आहे. सर्व राज्यांतील आमदार मतदारांची संख्या ४०३३ एवढी होती. ही संख्या मोठी असली तरी प्रत्येक राज्यात मतांचे मूल्य वेगवेगळे आहे. यामध्ये मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात असून, त्या किती मताधिक्य घेतात, याकडे सा-या देशाचे लक्ष असल्याचे बोलले जात आहे.